Hathras Stampede : चेंगराचेंगरी थांबवू शकले असते भोले बाबा; स्वत:च म्हणाले, "माझ्या पायाखालची माती..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 10:39 AM2024-07-09T10:39:47+5:302024-07-09T10:50:38+5:30
Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
हाथरसच्या फुलराई गावात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. बाबांनी जर ठरवलं असतं तर ही दुर्घटना थांबवता आली असती. सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगासमोर प्रत्यक्षदर्शींनी या गोष्टी सांगितल्या. याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे,
हाथरसच्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी तपास पथकासमोर त्या दिवशी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. देव चौधरी नावाच्या व्यक्तीने सांगितलं की, सत्संगाच्या वेळी बाबांनी लोकांना त्यांच्या पायाखालची माती घेण्यास सांगितलं. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि स्वयंसेवकांची कमतरता यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. महिला आरडाओरडा करत होत्या. जर बाबांनी मायक्रोफोनचा वापर करून हे थांबवा असं सांगितलं असतं तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.
भोले बाबांना बाहेर जाता यावं यासाठी मार्ग तयार करण्यासाठी त्यांचे सेवेकरी हे लोकांना बाजुला ढकलत होते असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ब्रिजबिहारी कौशिक नावाच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या स्थितीसाठी त्यांनी बाबांच्या प्रायव्हेट आर्मीला आणि सेवकांनाही जबाबदार धरलं.
हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेत पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. आता मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. सोमवारी दुपारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली.