१२१ जणांच्या मृत्यूप्रकरणी 'भोले बाबा'ला क्लीन चिट; हाथरस चेंगराचेंगरीसाठी पोलीस दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:49 IST2025-02-21T19:46:51+5:302025-02-21T19:49:01+5:30
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबांना क्लीन चिट मिळाली असून न्यायिक आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे

१२१ जणांच्या मृत्यूप्रकरणी 'भोले बाबा'ला क्लीन चिट; हाथरस चेंगराचेंगरीसाठी पोलीस दोषी
Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायिक आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला. या अहवालात नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. चेंगराचेंगरीसाठी पोलीस आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात आले आहे. अहवालानुसार, चेंगराचेंगरी झालेल्या सत्संगाच्या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षा मानकांचे पालन केलं नव्हतं असं म्हटलं आहे. याशिवाय या प्रकरणावरील एसआयटीच्या अहवालातही चेंगराचेंगरीसाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात आले असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे म्हटलं.
न्यायिक आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. हा अहवाल सभागृहात ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. न्यायालयीन आयोगाने आपल्या अहवालात या घटनेसाठी पोलीस आणि सत्संगाच्या आयोजकांचे निष्काळजीपणा जबाबदार धरला आहे. तसेचभविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयोगाने सूचनाही दिल्या आहेत. यापुढे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी तसेच आयोजकांनी कोणत्या अटींवर कार्यक्रमासाठी परवानगी घेतली याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची तरतूद असावी, असं असे आयोगाने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी २ जुलै रोजी हातरस येथील सिकंदरराव येथील फुलराई मुघलगढी गावात साकार नारायण विश्व हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये १२१ हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला. हातरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने २ जुलै २०२४ रोजी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रजेश कुमार श्रीवास्तव करत होते. तर निवृत्त आयएएस हेमंत राव आणि निवृत्त आयपीएस भावेश कुमार सिंह यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.
नारायण साकार हरी हे मूळचे एटा येथील पत्याळी तहसीलमधील बहादूरनगर गावचे रहिवासी आहेत. २६ वर्षांपूर्वी त्यांनी पोलीस खात्याची नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवचनात साकार हरी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असल्याचा दावाही करतात. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे त्यांचा आश्रम आहे. २०१४ पर्यंत साकार हरी यांनी त्यांच्या मूळ गावी बहादूरनगर येथे सत्संग केला. २०१४ नंतर त्यांनी इतर राज्यांचे दौरे सुरू केले. २००० मध्ये त्यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.