१२0 महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:45 AM2018-07-22T01:45:42+5:302018-07-22T01:46:13+5:30
हरयाणातील प्रकार; सापडल्या व्हिडीओ क्लिप्स; ब्लॅकमेल करण्याचाही आरोप
फतेहाबाद : तब्बल १२0 महिलांना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून हरयाणा पोलिसांनी ६0 वर्षे वयाच्या बाबा अमरपुरी या भोंदूबाबाला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले असून, ज्यांची त्याने फसवणूक केली वा ज्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले, त्या महिलांनी पुढे येऊ न तक्रार दाखल करावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
महिलांवर बलात्कार करताना हा भोंदूबाबा आपल्या मोबाइलद्वारे त्याचे चित्रीकरण करीत असे आणि त्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करीत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १२0 व्हिडीओ क्लिप्सही हस्तगत केल्या आहेत. त्यात तो वेगवेगळ्या महिलांसोबत दिसत आहे. या बाबाने त्यातील काही व्हिडीओज सोशल मीडियावरून प्रसारितही केले होते. ते फतेहाबाद शहरात व्हायरल झाल्यानंतर, लगेचच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. असे व्हिडीओ शेअर वा फॉरवर्ड करू नका, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे. स्वत:ला ‘बाबा अमरपुरी’ म्हणवून घेणाºया या बाबाचे खरे नाव ‘अमरवीर’ असले, तरी तो पूर्वी ‘बिल्लू’ याच नावाने ओळखला जात असे. एका पीडितेच्या नातेवाइकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, महिला पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली. महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख बिमला देवी यांनी सांगितले की, या बाबावर बलात्कार, विनयभंग, फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या काही कलमांन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करीत असे व चित्रीकरण करीत असे. मग त्याच्या आधारे ब्लॅकमेल करून महिलांना पुन्हा बोलावत असे. न आल्यास तुमचा व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत असे. (वृत्तसंस्था)
भाजपा नेत्यावर आरोप
आपणावर भाजपाच्या नीलेश सिंह या नेत्याने बलात्कार केल्याची तक्रार करूनही पोलीस कारवाई करण्यास तयार नाहीत, असा आरोप रायबरेली जिल्ह्यातील महिलेने केला आहे. आपला अश्लील व्हिडीओ तयार करून तो आपणास ब्लॅकमेल करीत आहे, अशी महिलेली तक्रार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून आपल्यावर नेता लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता ती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.