'पत्नी दिवसभर सेल्फी काढण्यात मग्न, जेवणही देत नाही', घटस्फोटासाठी पतीची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 04:47 PM2019-01-17T16:47:21+5:302019-01-17T17:16:49+5:30
लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात हल्ली स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे जशी कनेक्टिव्हिटी वाढलीय, तसेच यामुळे नात्यांमध्ये दुरावाही वाढतोय. स्मार्टफोनमुळे पती-पत्नीमधील वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचे प्रकरण समोर आले आहे.
लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात हल्ली स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे जशी कनेक्टिव्हिटी वाढलीय, तसेच यामुळे नात्यांमध्ये दुरावाही वाढतोय. स्मार्टफोनमुळे पती-पत्नीमधील वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना भोपाळमधली आहे. भोपाळमधील एका विवाहित जोडप्यामध्ये स्मार्टफोनमुळे प्रचंड कलह निर्माण झाला होता. स्मार्टफोन वापरण्याच्या कारणावरुन या पती-पत्नींमध्ये एवढी भांडणं होऊ लागली की दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयानं सुनावणीदरम्यान पती-पत्नीचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले. समुपदेशकांनी पती-पत्नीमधील भांडणाचं कारण शोधण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, तेव्हा केवळ एका स्मार्टफोनवरुन या जोडप्यामध्ये टोकाचे वाद होत असल्याचे त्यांना आढळले. समुपदेशक संगीता राजानी यांनी सांगितले की, समुपदेशादरम्यान पत्नीनं पतीबद्दलच्या तक्रारी मांडल्या. पती स्वतः स्मार्टफोन वापरतो आणि मला मात्र वापरण्यासाठी फीचर फोन दिला आहे. या फोनवरुन माहेरकडच्या मंडळींसोबत योग्यरितीनं संवादही होत नाहीत.
पत्नीच्या आरोपवर स्पष्टीकरण म्हणून पतीनं म्हटले, सासरी येताना पत्नी स्वतःसोबत स्मार्टफोन घेऊन आली होती. या स्मार्टफोनवर सेल्फी घेणे, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरच सतत ती आपला वेळ खर्च करते. स्मार्टफोनच्या नादात ती मला जेवणदेखील द्यायची नाही. या सगळ्या गोष्टींना कंटाळून तिच्याकडून फोन काढून घेतला.
कोर्टासमोर दोघांनी आपापली बाजू मांडली आणि तडजोड करण्यासही मंजुरी दर्शवली. यानंतर पत्नीने पतीसमोर सात अटी ठेवल्या, ज्या त्यानं मान्यही केल्या. दोघांनीही तडजोड करण्यास तयारी दर्शवल्यामुळे या दाम्पत्याची संसाराची गाडी पुन्हा ट्रॅकवर आली आहे.
कोर्टानं पती-पत्नींची बाजू ऐकून घेतली. दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर निर्णय देत कोर्टानं सांगितले की, ''महिलेनं घरातील सर्व काम उरकून घेतल्यानंतर मोबाइल हातात घ्यावा. सोबत लग्नाच्या वाढदिवशी पतीनं पत्नीला एक स्मार्टफोन गिफ्ट द्यावा''.
कोर्टाच्या आदेशानुसार, लग्नाच्या वाढदिवशी पतीनं आपल्या पत्नीला स्मार्टफोन खरेदी करुन दिला आणि त्याचे बिलही कोर्टासमोर सादर केले.
पत्नीनं पतीला घातल्या 7 अटी :
1. 15 दिवसांनी एक सिनेमा दाखवणे
2. महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जेवायला नेणे
3. वर्षातून एकदा शहराबाहेर पर्यटनासाठी नेणे
4. पतीनं कधीही पत्नीला माहेरी फोन करण्यास रोखू नये
5. माहेरी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमावर पतीनं टिप्पणी करू नये
6. प्रत्येक महिन्याला खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत. या रक्कमेचा हिशेबही विचारला जाऊ नये
7. माहेरच्या मंडळींविरोधात अपशब्द वापरू नये