भोपाळच्या शेतकऱ्याने पिकवली लाल भेंडी; जाणून घ्या, हृदयविकारापासून वाचवण्यासह 5 मोठे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:40 PM2021-09-07T12:40:59+5:302021-09-07T12:41:27+5:30
red ladyfinger : मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळमधील खजुरीकला भागातील शेतकरी मिसरीलाल राजपूत यांनी आपल्या शेतात लाल भेंडीचा लागवड केली आहे. ही भेंडीची लागवड आता चर्चेचा विषय बनली आहे. मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. ज्या लोकांना हृदयासंबंधीचे आजार किंवा ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भेंडी अतिशय आरोग्यदायी आहे. (bhopal farmer misrilal rajput grown red ladyfinger know 5 big benefits including saving heart disease)
भेंडीच्या उत्पादनाबद्दल मिसरीलाल राजपूत यांनी सांगितले की, मी वाराणसीच्या अॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिट्यूटमधून 1 किलो भेंडीचे बीज विकत घेतले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बीज पेरले. 40 दिवसांनंतर भेंडी लागण्यास सुरुवात झाली. याचबरोबर, या भेंडीच्या शेतीत कोणतंही घातक किंवा हानिकारक किटकनाशक वापरले गेले नाही. एका एकरात कमीत कमी 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल भेंडीचे उत्पादन मिळते. ही सामान्य भेंडीपेक्षा 7-8 पटीने महाग असते. काही मॉलमध्ये 500 ग्रॅम लाल भेंडीची किंमत 300-400 रुपये आहे, असे मिसरीलाल राजपूत म्हणाले.
या आजारांसाठी फायदेशीर
लाल भेंडीचे अनेक फायदे असल्याचा दावा शेतकरी मिसरीलाल राजपूत यांनी केला आहे. या लाल भेंडीचे 5 मोठे फायदे जाणून घ्या...
1- शेतकऱ्याचा दावा आहे की, लाल भेंडीच्या सेवनाने हृदयरोग होण्याची शक्यता खूप कमी आहे.
2- लाल भेंडीच्या सेवनामुळे रक्तदाब, मधुमेहाची कोणतीही समस्या होत नसल्याचा दावा.
3- उच्च कोलेस्टेरॉल ग्रस्त लोकांसाठी लाल भेंडीचे सेवन फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
4- अँथोसायनिन्समुळे महिलांच्या त्वचेसाठी आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी लाल भेंडीचे सेवन फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
5- डास, सुरवंट, किडे लाल भेंडीच्या पिकांमध्ये दिसत नाहीत. यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.