'तो माझ्या स्वप्नात येऊन मला छळतोय, त्याचा मृतदेह बाहेर काढा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:11 PM2020-02-19T15:11:05+5:302020-02-19T15:14:11+5:30
Bhopal Murder: इंसातची प्रेयसी जानू आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. जानू हैद्राबादच्या एका खासगी कंपनीत काम करत होती त्याचठिकाणी इंसात आणि जानूची ओळख झाली.
भोपाळ - मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एका युवतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. ७ डिसेंबर रोजी प्रेयसीने प्रियकराची हत्या करुन त्याचा मृतदेह आपल्याच खोलीत दफन केला होता. प्रेयसी २ महिने प्रियकराला दफन केलेल्या खोलीत राहत होती. मात्र सोमवारी त्या युवतीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.
या प्रेयसीने सांगितले की, त्याचा मृतदेह दफन केलेल्या जागेतून बाहेर काढा कारण तो रोज रात्री माझ्या स्वप्नात येऊन मला त्रास देत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीच्या खोलीत खोदकाम करुन इंसात मोहम्मद नावाच्या प्रियकराचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा ठावठिकाणा लागल्यानंतर प्रेयसी वारंवार तिच्या जबाबात बदल करत आहे. त्यामुळे नेमका मोहम्मद हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्याची हत्या करण्यात आली हे पोस्टमॉर्टमनंतर कळेल असं पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, इंसातची प्रेयसी जानू आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. जानू हैद्राबादच्या एका खासगी कंपनीत काम करत होती त्याचठिकाणी इंसात आणि जानूची ओळख झाली. इंसात आणि जानू सीधी येथील कमाच गावात एकत्र राहत होते. या दरम्यान इंसात एक-दोनदा स्वत:च्या घरीही गेला होता. मात्र त्याने जानूबाबत घरच्यांना काहीच माहिती दिली नाही.
सोमवारी जानू इंसातच्या घरी पोहचली आणि त्याच्या घरच्यांना सांगितले की, तिने ७ डिसेंबर रोजी इंसातला फॅनला टांगून मारलं आहे. जानूने इंसातला घरातीलच खोलीत दफन केल्याचीही माहिती दिली. तसेच गेल्या २ महिन्यापासून ती त्याच खोलीत राहत आहे. मात्र इंसात तिच्या स्वप्नात येऊन तिला त्रास देत आहे. त्यामुळे त्याला दफन केलेल्या जागेतून काढा आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करा असं जानूने इंसातच्या घरच्यांना सांगितले.
जानूने इंसातच्या घरच्यांना सांगितलेली माहिती त्यांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर जानूला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिसांच्या चौकशीत जानूने जबाब बदलत ७ डिसेंबरला आमच्या दोघांचे भांडण झालं होतं त्यानंतर इंसातने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितले. मात्र पोलिसांच्या भीतीपोटी इंसातचा मृतदेह खोलीतच दफन केल्याची माहिती जानूने पोलिसांना दिली.