...अन् महापौर तुंबलेल्या पाण्यात खुर्ची टाकून बसले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 01:09 PM2018-07-12T13:09:41+5:302018-07-12T13:12:25+5:30
समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांचा रस्त्यावर मुक्काम
भोपाळ: मध्य प्रदेशच्या राजधानीत सध्या तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सेफिया महाविद्यालय परिसरात पाणी साचलं आहे. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्यानं स्थानिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण पालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. लोकांची नाराजी दूर करण्यासाठी महापौर आलोक शर्मा तुंबलेल्या पाण्यात खुर्ची टाकून बसले आहेत.
मुसळधार पाऊस झाल्यानं आलोक शर्मा सखल भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. त्यामुळे महापौर शर्मा खुर्ची घेऊन तुंबलेल्या पाण्यात बसले. आपण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 'मी स्थानिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचा आढावा घेत आहे. शहराच्या प्रत्येक भागात जाऊन मी परिस्थिती पाहत आहे. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,' असं शर्मा यांनी सांगितलं. पुढील वर्षी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.
गेल्या वर्षीदेखील पावसाच्या दिवसांमध्ये भोपाळ शहरात पाणी साचलं होतं. त्यावेळी शर्मा यांनी आपत्कालीन बैठक बोलवली होती. रस्ते निर्मिती आणि पाण्याचा निचरा यावर बैठकीत चर्चादेखील झाली होती. मात्र या दोन्ही मुद्यांवर वर्षभरात फारसं काम झालं नाही. त्यामुळे यंदाही मध्य प्रदेशची राजधानी पाण्याखाली गेली आहे.