BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:11 AM2021-03-17T11:11:33+5:302021-03-17T11:17:02+5:30
Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आपल्याला बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. तसंच यासाठी कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
"बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर बनवल्या जाण्याचं वृत्त हे बनावट आहे. नीता अंबानी यांना विद्यापीठातून असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही," अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी एएनआयशी बोलताना दिली. बनारस हिंदू विद्यापीठात सामाजिक विद्यान विभागाकडून नीता अंबानी यांना विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांतून प्रकाशित झालं होतं. परंतु याचं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी खंडन केलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांची २०१४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नीता अंबनी यांनी २०१० मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. दरम्यान, एक यशस्वी उद्योजिका म्हणून बनारस हिंदू विद्यापीठानं त्यांना हा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात होतं.
Reports that Nita Ambani (in pic) will be a visiting lecturer at Banaras Hindu University (BHU) are fake. She hasn't received an invitation from BHU: Reliance Industries Limited spokesperson to ANI pic.twitter.com/dd8MUpER8T
— ANI (@ANI) March 17, 2021
विद्यार्थ्यांकडून विरोध
नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्त केल्याचं वृत्त समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विरोध करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय विद्यार्थ्यांनी कुलगुरूंवर बीएचयू उद्योजकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचाही आरोप केला. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. त्यानंतर कुलगुरूंच्या निर्देशांवरून सामाजिक विज्ञान विभागाचे प्रमुख कौशल किशोर मिश्र हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले होते. परंतु विद्यार्थी कुलगुरूंशीच चर्चा करण्यावर ठाम होते. कुलपतींनी यावर बाहेर येऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं पत्र विभाग प्रमुखांकडे सोपवलं होतं.