भुवनेश्वर रुग्णालयाचा मालक गायब

By admin | Published: October 20, 2016 04:36 AM2016-10-20T04:36:59+5:302016-10-20T04:36:59+5:30

२१ जणांचे मृत्यू झाल्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि हॉस्पिटलचे संस्थापक मालक मनोज नायक पोलीस कारवाईच्या भीतीने भूमिगत झाले

Bhubaneswar Hospital owner disappeared | भुवनेश्वर रुग्णालयाचा मालक गायब

भुवनेश्वर रुग्णालयाचा मालक गायब

Next

अंबिका प्रसाद कानुंगो,

भुवनेश्वर- येथील एसयूएम रुग्णालयातील आगीत २१ जणांचे मृत्यू झाल्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि हॉस्पिटलचे संस्थापक मालक मनोज नायक पोलीस कारवाईच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. हॉस्पिटलच्या चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, इतर चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. नायक यांच्या अटकेसाठी आरडाओरड सुरू झाली आहे.
नायक हे आयआयटीचे (खरगपूर) कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर व पीएच.डी.धारक आहेत. ते भुवनेश्वरच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे लेक्चरर म्हणून रुजू झाले. त्यांनी लेक्चररशिपच्या कालावधीत ‘शिक्षा ओ अनुसंधान’ ट्रस्ट स्थापन करून भुवनेश्वरमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ टेक्निकल एज्युकेशन अँड रिसर्च सुरू केली. अतिशय वेगाने नायक यांनी किमान दहा शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.
नायक याआधी अनेक वादांत सापडलेले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नायक व इतर अनेकांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा २००० मध्ये दाखल केला होता. आरोपपत्रात नायक यांचे नाव आल्यानंतरही त्यांनी अटक टाळली. राजकीय लागेबांधे वापरून त्यांनी व्यवसाय विस्तारला. नवीन पटनायक सरकारमधील अनेक मंत्र्यांशी नायक यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत, असे सांगितले जाते.
नायक यांनी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय सुरू केल्यानंतर काही वर्षांतच भुवनेश्वरमध्ये २००६ मध्ये एसयूएम हॉस्पिटल सुरू केले. आपल्या या हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागांत वाहने पाठविली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आणण्यासाठी मध्यस्थाचीही नेमणूक केली. या गटाकडून वैद्यकीय, दंत, अभियांत्रिकी, विधि महाविद्यालय, परिचारिकांना प्रशिक्षण शाळा, कृषी महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए आणि एमसीए महाविद्यालय चालविले जाते. या ग्रुपच्या मालकीची प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिनी आणि भाषिक दैनिकही आहे.
ओडिशा मानवी हक्क आयोगाने (ओएचआरसी) या आगीच्या घटनेची स्वत:हून दखल घेत राज्याचे आरोग्य सचिव आणि महासंचालकांना (अग्निशमन सेवा) नोटीस देऊन तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले. सम हॉस्पिटलचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी यांनी सुरक्षेच्या उपायांकडे हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे मानवी हक्क कार्यकर्ते सुभाष मोहपात्र यांनी केली आहे. आगीच्या घटनेची नि:पक्षपाती चौकशी करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
>नर्सचे धाडस
आगीच्या भयंकर संकटात बेबी भवानी (३०) या सहायक परिचारिकेने जीव धोक्यात घालून तिच्या देखरेखीखाली असलेल्या रुग्णांना ४० मिनिटे सांभाळले. तिची नेमणूक अति दक्षता विभागात होती.
कृत्रिम श्वासोच्छासावर ठेवलेल्या रुग्णांना बेबी सोडून गेली नाही.
धाडस आणि व्यावसायिक कौशल्यच तिने पणाला लावले होते. श्वास गुदमरल्यामुळे तिने रुग्णांना मरताना बघितले. बेबी भवानी आणि अन्य दोन परिचारिकांवर येथील एएमआरआय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचा बेबीला भयंकर धक्का बसला.

Web Title: Bhubaneswar Hospital owner disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.