भुजबळ बंधूंची चौकशी होणार
By admin | Published: February 18, 2015 02:04 AM2015-02-18T02:04:06+5:302015-02-18T02:04:06+5:30
संबंधित कंपन्यांना ‘लाभ’ दिल्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे
महाराष्ट्र सदनाचा ‘लाभ’: समीर, पंकज यांची एसीबी-ईडीमार्फत चौकशी
मुंबई : छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना ‘लाभ’ दिल्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे.
दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष चौकशी पथक नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे. भुजबळ यांच्या एमईटी या शिक्षण संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी या आधीच पूर्ण झाली आहे.
आम्ही आधी समीर यांची आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पंकज यांची चौकशी करू, असे विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. समीर-पंकज बंधूंची चौकशी केवळ महाराष्ट्र सदन प्रकरणी नसेल. अन्य जवळपास १२ प्रकरणांमध्ये आम्हाला चौकशी करावी लागणार आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही नामवंत कंपन्यांना बांधकाम विभागाने कंत्राटे दिली. या कंपन्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ पोहोचविला, असे आम आदमी पार्टीने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले होते. त्या दृष्टीने चौकशी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)