जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:23 AM2020-08-07T01:23:52+5:302020-08-07T01:24:01+5:30
अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत पूजा, दिव्यांची आरास करून जल्लोष
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा दूरचित्रवाणीवरून अमेरिका, ब्रिटनसह जगभरात मोठ्या भक्तिभावाने पाहिला गेला. एवढेच नाही, तर जगभरातील भारतीय समुदायाने घरोघरी सजावट करून पूजा, आरती केली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलँड, नेपाळसह जगातील अनेक देशांत दिवे लावून हा सोहळा दिवाळीसारखाच साजरा केला. भारतासोबत अवघे जग ‘जय श्रीराम’ या जयघोषाने राममय झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी, ५ आॅगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात करण्यात आले होते. एशियन न्यूज इंटरनॅशनल आणि असोसिएटस प्रेस टेलिव्हिजन न्यूजच्या माध्यमातून जगभरात या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरदर्शनच्या डीडी न्यूजने स्वतंत्रपणे या सोहळ्याची दृश्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी प्रसारित केले.
मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही
मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही, हा सौहार्दपूर्ण संदेश देण्यासाठी मी राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला गेलो होतो, असे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले. अयोध्या खटल्यातील पक्षकार दिवंगत हाशीम अन्सारी यांचे इक्बाल अन्सारी पुत्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. हिंदू बांधव आमच्यासोबत आहेत आणि आम्ही या आनंदाच्या क्षणी त्यांच्यासोबत आहोत, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे.