अयोध्येत ५०० कोटी रुपयांच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:52 AM2020-07-28T04:52:21+5:302020-07-28T04:52:38+5:30
जय्यत तयारी : भिंती रंगल्या, रस्त्याच्या दुतर्फा भगवान रामाचे होर्डिंग्ज
त्रियुग नारायण तिवारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अयोध्या : राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून जवळपास ५०० कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे भूमीपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
अयोध्येत जी कामे होणार आहेत त्यात पिण्याच्या पाण्याची योजना असून यासाठी ५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तुलसी भवनाच्या आधुनिकीकरणासाठी १८ कोटी, राम कथा पार्कच्या विस्तारीकरणासाठी पावणेतीन कोटी, अयोध्या ते बसखारी या ३७ किमीच्या चार पदरी मार्गासाठी २५२ कोटी तसेच राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजचा लेक्चरर हॉल, प्रशासकीय भवन, ग्रंथालय, वसतिगृह यांचे लोकार्पण यांचा समावेश
आहे. लक्ष्मण किल्लाघाटाचे लोकार्पण (१० कोटी), अयोध्या चार पदरी रस्त्यानजीक नव्या बसस्थानकास ८ कोटी, विभागीय आरोग्य केंद्राचे लोकार्पण आणि अन्य काही कामांचे भूमीपूजन होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या ५ आॅगस्टच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. अयोध्येचे डीआयजी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी अयोध्येचा दौरा करुन सुरक्षेची पाहणी केली.
ते ‘रामभक्त’ही निघाले
आता न्यायालयाच्या आदेशानेच भव्य राममंदिर उभे राहणार असल्याने मुस्लिमांमधील बऱ्याच लोकांनाही आनंद झाला असून, या भव्य मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनासाठी अनेक मुस्लिम ‘रामभक्त’ अयोध्येकडे रवाना होत आहेत. छत्तीसगढमध्ये राहणारे फैज खान यांनी, मंदिर उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेने, त्यांच्या मूळ गावाहून मंदिरासाठी विटा सोबत घेऊन अयोध्येत येऊन दाखल झाले आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे अवध प्रांतप्रमुख डॉ. अनिल सिंग यांनी फैज खान विटा घेऊन आले आहेत, यास दुजोरा दिला.
२००० फूट खोलवर टाईम कॅप्सूल
भविष्यात मंदिराशी संबंधित मुद्यांवर वाद होऊ नयेत म्हणून या परिसरात २००० फूट खोलवर टाइम कॅप्सुल ठेवण्यात येईल. या कॅप्सुलमध्ये मंदिराचा इतिहास, याबाबतची माहिती असेल.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, भविष्यात जर कुणाला राम मंदिराच्या इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर त्यांना राम जन्मभूमीशी संबंंधित माहिती मिळून जाईल आणि नवा वाद निर्माण होणार नाही. ही कॅप्सुल एका ताम्रपत्रात ठेवली जाईल.