PM मोदींच्याहस्ते उद्या 'पालखी मार्गाचे' भूमीपूजन, 11 हजार कोटींचे रस्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 04:32 PM2021-11-07T16:32:19+5:302021-11-07T16:35:10+5:30
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवार, ८ नाोव्हेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दिवशी ते पालखी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करणार असून पंतप्रधाननरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखी मार्गाचे व्हर्च्युअल भूमीपूजन होणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वार महाराज पालखीमार्ग 221 किमी, तर 130 किमी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस ते तोंडले-बोंडले असा असणार आहे.
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. उद्या या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग 965 हा 4 पदरी रस्ता होणार असून 965G हा तीन पदरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग होत आहे. या दोन्ही महामार्गासाठी एकूण अंदाजे खर्च हा 11,090 कोटी रुपये एवढा वर्तविण्यात आला आहे.
During the event, PM will also dedicate over 223 Km of completed & upgraded road projects, constructed with an estimated cost of over Rs 1180 Cr at different NHs for boosting connectivity to Pandharpur. The event will take place via video conferencing: PMO
— ANI (@ANI) November 7, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच कार्यक्रमात पंढरपूरला जोडणाऱ्या इतरही महामार्गांचे लोकार्पण करणार आहेत. राज्यातील हे महामार्ग एकूण 223 किमीचे असून यासाठी अंदाजे रक्कम 1180 कोटी रुपये खर्च होत आहे.
नितीन गडकरी अन् मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पंढरपूर ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू केले आहे. या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी सोमवारी दुपारी १२ वाजता पंढरपुरात दाखल होतील. प्रथम ते विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेतील. पंतनगर येथे गडकरींच्या उपस्थितीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे भूमीपूजन करुन जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्तिकी यात्रेच्या गडबडीत वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्याचा काढला तोडगा काढला आहे.