भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पटेल समाजाची नाराजी गुजरातमध्ये दूर होईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:30 AM2021-09-14T05:30:33+5:302021-09-14T05:31:17+5:30
गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून देणे, हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असून, त्यासाठी वेळ खूप कमी आहे.
गांधीनगर :गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेणाऱ्या भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि त्यांची खाती ठरवावी लागणार आहेत. त्यांनी आज एकट्यानेच शपथ घेतली. गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून देणे, हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असून, त्यासाठी वेळ खूप कमी आहे. गुजरातमध्ये २००२ पासून भाजप सलग सत्तेत आहे. त्यामुळे २० वर्षानंतरही राज्यातील सत्र कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
पुढील वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होतील. पटेल समाजाची नाराजी दूर करणे, त्यांना भाजपकडे खेचणे यासाठी त्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागतील. पटेल २०१७ साली पहिल्यांदा आमदार झाले आणि आता थेट मंत्री. त्यांना प्रशासनाचा अनुभवही नाही. त्यामुळे ते सरकार, प्रशासन व पक्ष यांच्यात कसा समन्वय ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष राहील.
विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधी भाजपने २०१७ साली विधानसभा आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले होते. त्यामुळे पटेल समाज अधिक नाराज झाला होता. आता माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने ते व समर्थक नाराज आहेत. आपण नाराज नसल्याचे ते आज म्हणाले, तेव्हा त्यांच्या डोळय़ांत अश्रू तरळत होते. शपथविधीआधी भूपेंद्र पटेल यांनी नितीन पटेल यांची भेट घेतली. विजय रुपानी यांचे आशीर्वाद घेतले.
भूपेंद्र पटेल यांचा पटेल समाजाच्या अनेक संघटनांशी संबंध आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये भाजपचा झेंडा फडकावत ठेवण्याचे आव्हान पेलणे त्यांना शक्य होईल का, याची चर्चा सुरू आहे. गेल्या वेळी मुख्यमंत्री बदलूनही भाजपला कशीबशी सत्ता मिळाली होती . विधानसभा निवडणुकांत भाजपच्या जागा कमी होऊन त्या ९९ वर आल्या होत्या व काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)
पाच मुख्यमंत्री, अमित शहा उपस्थित
पटेल यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, बसवराज बोम्मई, प्रमोद सावंत, हिमंत बिस्वा सरमा हे पाच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन करताना, त्यांच्या कार्यक्षमतेचा विशेष उल्लेख केला.
अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांची यादी : काँग्रेस
भाजपकडे अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांची मोठी यादी आहे. त्यांना बदलण्यात पक्ष व्यग्र आहे, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, बी. एस. येडीयुरप्पा, त्रिवेंद्रसिंह रावत, तीरथसिंह रावत हे अकार्यक्षम आहेत हे कर्नाटक व उत्तराखंडातील जनतेला कळून चुकले होते. भाजपकडे अजूनही काही अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. हरयाणा, गोवा, त्रिपुराचे अशी मोठी यादीच आहे.