सिद्धू मूसेवालांच्या हत्येनंतर भूप्पी राणा, नीरज बवाना आणि बंबीहा गँग सोशल मीडियावर सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:31 PM2022-06-02T15:31:21+5:302022-06-02T15:36:57+5:30
Sidhu Moosewala : भूप्पी राणा गँग ही नीरज बवाना आणि बंबीहा गँगची सहयोगी गँग आहे. नीरज बवाना हा दिल्लीतील टॉप गँगस्टारपैकी एक असून तो सध्या तिहार तुरुंगात बंद आहे.
चंदीगड : गँगस्टर भूप्पी राणा गँगने फेसबुकवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. फेसबुक मेसेजमध्ये म्हटले आहे की, सर्व बंधू, भगिनी, माता आणि ज्येष्ठांना सत श्री अकाल, मला तुम्हा सर्वांसोबत एक गोष्ट सांगायची आहे. आता त्यांनी आमचा भाऊ दलेर जाट सिद्धूचा खून केला आहे, जो कोणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची माहिती देईल, त्याला 5 लाखांचे बक्षीस दिले जाईल आणि नाव गोपनीय ठेवले जाईल. दरम्यान, यासंबंधीचे वृत्त न्यूज 18 हिंदीने दिले आहे.
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बंबीहा गँगशी संबंधित गँग सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे आणि त्यांच्या टोळीचा सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही करत आहेत. तरीही बंबीहा गँग ही लॉरेन्स बिश्नोई गँगला लक्ष्य करत आहे आणि हत्येचा बदला घेण्याची धमकी देत आहेत. मात्र, पंजाब हायकोर्टातच आज सरकारने खुनाच्या एफआयआरमध्ये सिद्धू मूसेवाला यांच्या नावाचा उल्लेखही नसल्याचा खुलासा केला आहे.
भूप्पी राणा गँग ही नीरज बवाना आणि बंबीहा गँगची सहयोगी गँग आहे. बुधवारी, दिल्लीस्थित नीरज बवाना गँगने पंजाबमध्ये सिद्धू मूसेवाला यांच्या दिवसाढवळ्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बदला घेण्याची धमकी दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये या गँगने अवघ्या दोन दिवसांत निकाल देण्याचा इशारा दिला आहे. 'नीरज बवाना दिल्ली एनसीआर' नावाच्या फेसबुक प्रोफाइलद्वारे ही पोस्ट अपलोड करण्यात आली आहे.
नीरज बवाना हा दिल्लीतील टॉप गँगस्टारपैकी एक असून तो सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. नीरज बवानावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण, त्याच्या गँगचे सदस्य दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये आहेत. नीरज बवानाच्या गँगमधील काही मुले त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स हाताळतात, त्याच्या गँगच्या नावाने फेसबुकवर डझनभर पेजेस आहेत आणि लाखो फॉलोअर्स आहेत.
दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला चौकशीसाठी पंजाबमध्ये आणले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने मुसेवाला हत्याकांडप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतल्यानंतर, पंजाब पोलिसांनीही या प्रकरणात कागदोपत्री कार्यवाही सुरू केली आहे, जेणेकरून बिश्नोईला ट्रान्झिट रिमांडवर पंजाबमध्ये आणता येईल.