'या' पोरीची 'केस'च वेगळी; वयाच्या नवव्या वर्षीच दोन विक्रमांना गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:18 PM2019-08-28T17:18:40+5:302019-08-28T17:19:45+5:30
आपल्याकडे अनेक अशा व्यक्ती आहेत, ज्या आपल्या हटके कारनाम्यांसाठी ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत. जी सध्या आपल्या आगळ्या वेगळ्या कामगिरीमुळे चर्चेत आहे.
आपल्याकडे अनेक अशा व्यक्ती आहेत, ज्या आपल्या हटके कारनाम्यांसाठी ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत. जी सध्या आपल्या आगळ्या वेगळ्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. छोट्या वयात केलेल्या मोठ्या कामांमुळे अवघ्या 9 वर्षांच्या या मुलीवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता तुम्ही म्हणाल या मुलीने असं काय केलं आहे? या मुलीचं नाव बियांका दलवाडी असं असून तिने केलेल्या कामांची दखल घेत तिचं नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदविण्यात आलं आहे.
अवघ्या 9 वर्षांच्या बियांकाच्या नावावर एक नाहीतर चक्क दोन रेकॉर्ड नोंदविण्यात आले आहेत. बियांका 7 वर्षांची असताना तिने 'C+ जावा' ही कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची 3 तासांची परिक्षा फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. ही कामगिरी करणारी बियांका जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रामर ठरली. सध्या ती रोबॉटिकचा अभ्यास करत आहे. त्यानंतर बियांकाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तिच्या 38.5 इंच लांब केसांमुळे आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविला आहे. लांब केसांचा रेकॉर्ड करणारी ही सर्वात लहान मुलगी आहे.
'C+ जावा' या कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या परिक्षेमध्ये बियांकाला 86 टक्के गुण मिळाले होते. तिच्या या दोन्ही कामांची दखल घेत, 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'च्या टिमने मेडल आणि सन्मापत्र देत तिचा गौरव केला असल्याचे बियांकाची आई चेलसी दलवाडी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही बियांकाचा सन्मान केला.
चेलसी दलवाडी यांनी सांगितले की, 'बियांकाने मिळवलेल्या या यशाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील देण्यात आली. पंतप्रधानांनी बियांकाचे कौतुक करत लवकरच तिला आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावण्याचे आश्वासनही दिले.'
बियांका तिच्या लांब केसांच्या रेकॉर्डबाबत विचारल्यावर तिने सर्व श्रेय आपल्या आईला देत, तिच्यामुळेच हे सर्व शक्य झालं असल्याचं सांगितलं.