सायकलचा वाद दिल्लीत !

By admin | Published: January 3, 2017 04:18 AM2017-01-03T04:18:05+5:302017-01-03T04:18:05+5:30

मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पिता-पुत्रातील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता सपाचे निवडणूक चिन्ह सायकल स्वत:कडे ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे

Bicycle dispute in Delhi! | सायकलचा वाद दिल्लीत !

सायकलचा वाद दिल्लीत !

Next

हरीश गुप्ता , नवी दिल्ली
मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पिता-पुत्रातील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता सपाचे निवडणूक चिन्ह सायकल स्वत:कडे ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे. मुलायमसिंह यादव एव्हाना दिल्लीत दाखल झाले असून, ते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत, तर आयोगाच्या निर्णयाकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाजवादी पक्षाचे नाव, चिन्ह आणि संपत्ती यावरून हा कौटुंबिक संघर्ष आता उफाळला आहे. जर मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक आयोगाची पायरी चढली, तर अखिलेश यादव यांनी आपली बाजू मांडण्यासाठी रामगोपाल यादव यांना सज्ज ठेवले आहे. दोन्हीही गट आपली बाजू मांडण्यासाठी तयार आहेत.

दरम्यान, सपाच्या घटनेत कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांना हटविण्याची कोणतीही तरतूद नाही, तर फक्त अध्यक्षच पक्षाचे अधिवेशन बोलावू शकतात, त्यामुळे बंडखोर गटाकडून मुलायमसिंह यांच्याविरुद्ध घेतला गेलेला कोणताही प्रस्ताव बेकायदेशीर ठरतो. या दाव्या-प्रतिदाव्यांकडे निवडणूक आयोग कशाप्रकारे बघतो हे कोणीही सांगू शकत नाही. एक बाब मात्र नक्की आहे की, ४०३ सदस्यांच्या विधानसभेत अखिलेश यांच्याकडे २२९ सदस्यांचा मोठा पाठिंबा आहे. काँग्रेसचे २८, राष्ट्रीय लोकदल ८, एनसीपी १ आणि एआयटीसी १, तसेच अपक्षांचाही अखिलेश यांनाच पाठिंबा आहे. त्यामुळे अखिलेश यांना सभागृहात तसा कोणताच धोका नाही, तर अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशात महाआघाडीचे नेते म्हणून उदयाला येऊ शकतात.

तोडगा न निघाल्यास चिन्ह गोठवणार
उत्तर प्रदेशातील निवडणुका एकीकडे तोंडावर आलेल्या असताना सपाच्या निवडणूक चिन्हाचा वाद सोडविणे तसे अवघड काम आहे. जर निवडणूक आयोगाकडे काही तोडगा नसेल तर सध्याचे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते, तर दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह दिले जाऊ शकते, असे कश्यप यांनी सांगितले. सायकल निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे अधिकृत नाव यासाठी अखिलेश यादव यांना संघर्ष करावा लागणार आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, यावर तात्काळ निर्णय घेणे निवडणूक आयोगासाठी कठीण आहे.
मुलायमसिंह यादव यांनी पक्ष आणि चिन्हावरील आपली पकड कायम ठेवली तर अखिलेश यादव हे पर्यायी चिन्ह निवडू शकतात. मुलायमसिंह यांचा असा युक्तिवाद असू शकतो की, ते समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे सायकल या चिन्हावर त्यांचाच हक्क आहे.

उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अखिलेश यादव यांनी समाजवादी जनता पार्टीच्या कमल मोरारका आणि गोपी मनचंदा यांच्याशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी त्यांचे ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. जनता दलाचे (एस) नेते देवेगौडा आणि इतर समाजवादी गट अखिलेश यादव यांचे समर्थन करतील, असा अंदाज आहे. जर असे झाले तर भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, कारण अखिलेश यादव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा कोणताही वैयक्तिक आरोप नाही.

Web Title: Bicycle dispute in Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.