मोदींच्या त्या सूटसाठी लागली सव्वा कोटींची बोली
By admin | Published: February 18, 2015 10:30 AM2015-02-18T10:30:24+5:302015-02-18T15:32:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सूटसाठी १.२१ कोटी रुपयांची बोली सूरतमध्ये लागली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित सूटसाठी १.२१ कोटी रुपयांची बोली सूरतमध्ये लागली आहे. बराक ओबामांसोबतच्या कार्यक्रमात मोदींनी नरेंद्र दामोदरदास मोदी असं एम्ब्रॉयडरी केलेला सूट घातला होता. स्वत:च्या नावासाठी मोदी किती दुराग्रही आहेत अशी त्यांच्यावर टीकाही झाली होती. तसेच या सूटसाठी त्यांनी ५ ते १० लाक रुपये उधळल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. मात्र, हा सूट त्यांना एका चाहत्याने भेट दिल्याचे समोर आले आहे. तसेच या सूटच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम ते गंगेच्या शुद्धीकरणाच्या कार्यात खर्च करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लिलावामध्ये सुरेश अग्रवाल या व्यावसायिकाने हा सूट एक कोटी रुपयांना विकत घेण्याची बोली लावली. त्यानंतर विरल चोक्सी या अनिवासी भारतीयाने १.११ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर कडी करताना राजेश जुनेजा यांनी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
गंगा शुद्धीकरणासारख्या चांगल्या कामासाठी ही रक्कम जाणार असल्याने आपण चढी बोली लावत असल्याचे सहभागी उद्योजकांनी सांगितले.
मोदींना गिफ्ट म्हणून मिळाला होता लाखमोलाचा सूट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुचर्चित आणि महागड्या सूटचे गुढ उकलले असून एका अनिवासी भारतीयानेे मोदींना हा सूट भेट दिल्याचे समोर आले आहे. मोदी हे आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असल्याने त्यांना हा सूट दिल्याचे रमेशभाई विरानी यांनी सांगितले असून सूटवरुन निर्माण झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यात बंद गळ्याचा सूट घातला होता. या सूटवर सोनेरी धाग्याने नरेंद्र दामोदारदास मोदी असे वीणकाम करण्यात आले होते. या सूटची किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याची चर्चा होती. यावरुन विरोधकांनी मोदींवर चांगलीच टीका केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा सूट १० लाख रुपयांचा असल्याचा दावा केला होता. या सूटवर मोदींकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.
मोदींकडे लाखमोलाचा सूट कसा आला व सूटची किंमत याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. अखेरीस मोदींकडे हा सूट कसा आला याचे गुढ उकलले आहे. रमेशभाई विरानी हे अनिवासी भारतीय असून ते हिरे व्यापारी आहेत. रमेशभाई यांचा मुलगा स्मित विरानीचा २६ जानेवारी रोजी विवाह होता. विरानी कुटुंबीय व मोदी यांचे जुने संबंध असून रमेशभाई यांचे वडिल मोदींना नेहमी कपडे भेट म्हणून द्यायचे. वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरी हा पहिलाच आनंदाचा क्षण होता. या सोहळ्यात नरेंद्र मोदींनी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून उपस्थित राहावे असे आम्हाला वाटत होते असे रमेशभाई विरानी यांनी सांगितले. व्हायब्रंट गुजरात या परिषदेत मी मोदींना मुलाच्या लग्नासाठी आमंत्रण दिले आणि भेट म्हणून हा सूटही दिला. हा सूट घालून त्यांनी लग्नाला यावे असे आम्हाला वाटत होते. पण २६ जानेवारीलाच ओबामाही भारतात असल्याने लग्नाला येऊ शकणार नसल्याचे मोदींनी मला सांगितले. पण तुम्ही दिलेले सूट एकदा घालीन व नंतर त्याचा लिलाव करुन ती रक्कम गंगा मोहीमेसाठी देईन असे मोदींनी त्यावेळीच सांगितले होते असे विरानी यांनी म्हटले आहे.