नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:44 AM2021-10-08T05:44:17+5:302021-10-08T05:44:50+5:30
PM Narendra Modi Gifts Auction: धार्मिक, ऐतिहासिक वस्तूंनाही मागणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ऐतिहासिक व धार्मिक महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. तसेच ऑलिम्पिक खेळा़डूंच्या वस्तूंनाही चांगली मागणी आहे.
पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती. आता या रकमेत वाढ होऊन ती १ कोटी २० हजार रुपये झाली आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावण्याची मुदत गुरुवारी संध्याकाळी संपली. या लिलावाला १७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने ज्या भाल्याच्या साहाय्याने सुवर्णपदक जिंकले, त्या भाल्यावर त्याने आपली स्वाक्षरी केली व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. नीरज चोप्राच्या भाल्याला १० कोटी रुपयांची बोली ४ ऑक्टोबर रोजी लावण्यात आली होती. मात्र ही बोली बनावट असल्याचा संशय आल्याने ती रद्द करण्यात आली.
टोकियोमधील पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता खेळाडून कृष्ण नागर याने वापरलेल्या बॅडमिंटन रॅकेटला ८०.१५ लाख रुपयांची बोली मिळाली आहे. मात्र हे रॅकेट खरेदी करण्यास फक्त तीन जणांनीच रस दाखविला आहे. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची एकत्रित मूर्ती पंतप्रधान मोदींना भेट मिळाली होती. धातूची ही मूर्ती विकत घेण्यासाठी ४४ जणांनी बोली लावली. त्यातील सर्वाधिक बोली १.३५ लाख रुपयांची आहे.
राममंदिराच्या प्रतिकृतीसाठी २४ बोली
अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिराची लाकडी प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली होती. या प्रतिकृतीची मूळ बोली अडीच लाख रुपये ठरविण्यात आली. धार्मिकदृष्ट्या महत्व राखून असलेली ही प्रतिकृती विकत घेण्यासाठी आतापर्यंत २४ बोली लागल्या आहेत. धातूच्या गदेची मूळ बोली अडीच हजार रुपये असली तरी तिच्यासाठी ५४ बोली लागल्या. या गदेची सर्वाधिक बोली आता ५ लाख रुपयांची आहे.