लाकडी सायकलसाठी ५० लाखांची बोली; १०० वर्षांपूर्वी बनविलेली सायकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 06:33 AM2021-09-16T06:33:29+5:302021-09-16T06:34:06+5:30
चाके, पॅडेलही लाकडाचेच
लुधियाना : सायकलचे सध्या अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. मात्र, पंजाबमधील लुधियानात असलेली १०० वर्षे जुनी व लाकडापासून बनविलेली सायकल सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. पूर्वी ही सायकल बनविण्यासाठी तसेच ती चालविण्यासाठी चक्क सरकारी परवाना काढावा लागला होता. लाकडी सायकल ५० लाख रुपयांना खरेदी करण्याची तयारी एकाने दाखविली होती. मात्र, सायकलच्या मालकाने ती विकण्यास नकार दिला.
या सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले की, ही सायकल माझ्या वडिलांनी पूर्वी एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून खरेदी केली होती. ती चालविण्यासाठी सरकारकडून परवानाही घेतला होता. तो माझ्या काकांच्या नावे होता. ही लाकडी सायकल पाहण्यासाठी अनेक लोक माझ्या घरी येत असतात. आजही ही सायकल उत्तम स्थितीत आहे. या सायकलवर बसून फेरफटका मारता येतो.
ते म्हणाले की, लाकडी सायकल खरेदी करण्यासाठी एक विदेशी व्यक्ती आला होता. त्याने ५० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आम्ही ही सायकल त्याला विकली नाही. कारण छंदाचे मोल पैशात करता येत नाही. आपल्या पूर्वजांची निशाणी असल्याने कोणत्याही किमतीला ते ही सायकल विकण्यास तयार नाहीत. त्यामुळेच गिअर असलेल्या अत्याधुनिक सायकलच्या जमान्यात ही सायकल आजही आपले वेगळेपण टिकवून आहे. (वृत्तसंस्था)
अत्यंत कुशलतेने निर्मिती
लाकडी सायकलची सीट, पॅडल, चाके हे लाकडापासून अत्यंत कुशलतेने बनविले आहेत. तिची चाके किती रुंदी व आकारमानाची असावीत याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. अशा गोष्टींमुळेच ही सायकल वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. पूर्वी ज्याप्रमाणे लाकडापासून सायकल बनविली होती, तसेच काही देशांत बांबूपासून सायकल बनविण्याचे प्रयोगही झाले आहेत.