ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:38 PM2024-09-03T21:38:48+5:302024-09-03T21:39:14+5:30
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे.
West Bengal Rape-Murder Case :पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्याप्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अखेर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे. त्याला पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलमधूनही निलंबित करण्यात आले आहे.
आरजी कार हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरुन सोमवारी सीबीआयने संदीप घोषसह चार जणांना अटक केली होती. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
9 ऑगस्ट रोजी बलात्कार
संदीप घोष आणि आरजी कार हॉस्पिटल सध्या वादात आहेत. 9 ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संदीप घोष यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. याप्रकरणी सीबीआयने त्याची अनेकदा चौकशीही केली आहे. सीबीआयने नुकतीच घोषची पॉलिग्राफी चाचणीही घेतली होती.
कोलकाता बलात्कार प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये निदर्शने सुरू आहेत. भाजपसह सर्व विरोधी पक्ष सातत्याने संदीप घोष याच्यावर कारवाईची मागणी करत होते. अखेर बलात्कार आणि हत्येच्या 26 दिवसांनी पश्चिम बंगाल सरकारने घोष याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
सीबीआयने एफआयआर दाखल केला
याप्रकरणी सीबीआयने नुकतीच एफआयआर नोंदवली होती. घोष आणि इतरांविरुद्ध कलम 120बी (गुन्हेगारी कट), आयपीसी कलम 420 (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणांतील शिक्षेबाबत बोलायचे झाल्यास, 120B मध्ये कमाल 2 वर्षे ते जन्मठेप, 420 मध्ये कमाल 7 वर्षे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 6 महिने ते 5 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. घोष याच्याशिवाय या प्रकरणात सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिप्लव सिंघा, सुमन हजारा, अफसर अली याचा समावेश आहे.