राजीनामा देणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई, कंपनीच्या सर्व पदांवरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:40 PM2022-03-02T13:40:12+5:302022-03-02T13:41:02+5:30
Ashneer Grover : राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - फिनटेक कंपनी भारत पे आणि अशनीर ग्रोव्हर यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आता राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर कंपनीने एका पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच आर्थिक अनियमिततेबाबत अशनीर ग्रोव्हर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही कंपनीकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, अशनीग ग्रोव्हर यांनी बोर्डाला एक भावूक पत्र लिहून राजीनामा दिला होता. या पत्रामध्ये अनेक भावूक बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच बोर्डावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले होते. त्यात अशनीर ग्रोव्हर म्हणाले होते की, मी दु:खी अंत:करणाने हे पत्र लिहित आहे. कारण मी जी कंपनी तयार केली, तीच कंपनी मला सोडावी लागत आहे. मात्र भारत पे फिनटेकच्या जगात अग्रणी बनली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक निराधार बाबींमध्ये गुंतवण्यात आले. कंपनीमध्ये जे असे लोक आहेत जे माझी प्रतिमा मलिन करत आहेत. ते कंपनीचे रक्षण करण्याचा दिखावा करत असेल तरी ते प्रत्यक्षात भारत पे ला नुकसान पोहोचवू इच्छित आहेत.
दरम्यान, अशनीर ग्रोव्हरवरील कारवाईनंतर भारत पे कंपनीने सांगितले की, भारत पे आपले कर्मचारी आणि ग्राहकांसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. कंपनी यापुढेही भारतामध्ये फिनटेक लीडर राहण्यासाठी योग्य ती पावले उचलेल. कंपनीने संचालनाच्या उच्च मानकांना लागू करण्यासाठी तक्रारींबाबत अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हा तपास इंडिपेंडेंट एक्स्टर्नल अॅडव्हायझर्स करत आहेत.