रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी कारवाई, NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:04 IST2024-04-12T13:03:53+5:302024-04-12T13:04:45+5:30
Rameswaram Cafe Blast Case: बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे येथे झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने या स्फोटांप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी कारवाई, NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे येथे झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने या स्फोटांप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. एनआयएने विविध यंत्रणांच्या मदतीने या स्फोटातील मुख्य आरोपी मुसाविर हुसेन शाजिब याला अब्दुल मतीन ताहा याच्यासोबत ताब्यात घेतले आहे.
आरोपी सावीर हुसेन शाजिब आणि अब्दुल मथीन ताहा हे दोघेही कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथील रहिवासी आहेत. एनआयएला ते लपून बसलेल्या पूर्व मिदनापूरमधील दिघा येथील त्यांच्या ठिकाणाचा सुगावा लागला होता. तिथूनच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी एनआयएने मुसावीर हुसेन शाजिब आणि सह आरोपी अब्दुल मतीन ताहा यांची ओळख पटवली होती.
या कारवाईबाबत एनआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील १८ ठिकाणी छापेमारी केली होती. १ मार्च रोजी कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये काही जण जखमी झाले होते.
तत्पूर्वी या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना चिकमंगळुरूमधील खालसा येथून मुजम्मिल शरीफ याला २६ मार्च रोजी अटक करण्यात आळी होती. त्याच्यावर मुख्य आरोपीला रसद पुरवल्याचा आरोप होता. दरम्यान, २९ मार्च रोजी फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.