नितीश कुमार यांच्याबाबत महाआघाडीला प्रेमाचे भरते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:43 AM2019-06-05T04:43:14+5:302019-06-05T06:19:37+5:30

मांझी यांच्याशी गळाभेट; राजदच्या नेत्यानेही दिला ऐक्याचा संदेश

Big bang about love for Nitish Kumar | नितीश कुमार यांच्याबाबत महाआघाडीला प्रेमाचे भरते

नितीश कुमार यांच्याबाबत महाआघाडीला प्रेमाचे भरते

Next

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे केंद्रातील भाजपप्रणीत सत्ताधारी रालोआशी बिनसले असल्याच्या वृत्तामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनला पुन्हा एकवार नितीश यांच्याविषयी प्रेमाचे भरते आल्याचे दिसत आहे.

महाआघाडीतील हिंदुस्थान अवाम मोर्च्याचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी सोमवारी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला नितीश कुमार उपस्थित राहिल्याने बिहारमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्या इफ्तार पार्टीमध्ये नितीश कुमार यांनी मांझी यांना मिठीच मारली. याच मांझी यांना नितीश यांनी काही वर्षांपूर्वी पक्षातून काढले होते. नितीश यांच्या येण्याआधी राबडीदेवी याही त्या इफ्तार पार्टीला पोहोचल्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी जनता दल (संयुक्त) ने आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला जीतनराम मांझी गेले होते.

इफ्तारविषयी विचारता राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की आम्हाला नितीश कुमार यांचे वावडे (अ‍ॅलर्जी ) नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. तुमचे हे म्हणजे लालुप्रसाद यादव यांना मान्य होईल का, या प्रश्नावर सिंह म्हणाले की, मी आता माझे म्हणणे उघडपणे व्यक्त केले आहे. मी आणि लालुप्रसाद यांनी अनेक वर्षे एकत्र कामही केले आहे.

नितीश कुमार यांच्याविषयी मांझी म्हणाले की, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्याने माझे व त्यांचे बिनसले होते. पण त्याला चार वर्षे झाली. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझे नितीश यांच्याशी कायमचे भांडण नाही.

वेगळे होण्याची तयारी?
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने मोदी मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर नंतर स्वत:च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपला विश्वासातही घेतले नाही. आता राज्यात स्वत:चा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाण्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Big bang about love for Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.