महाठक! गृहमंत्रालयाचा संयुक्त सचिव बनून घातला 1 कोटी रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:49 PM2017-10-09T18:49:06+5:302017-10-09T18:53:41+5:30
अक्षयकुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटात बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून एक टोळीने लोकांना गंडा घातल्याचे तुम्ही पाहिजे असेलच. काहीसा असाच प्रकार उघडकीस आला आहे.
फरिदाबाद - अक्षयकुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटात बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून एक टोळीने लोकांना गंडा घातल्याचे तुम्ही पाहिजे असेलच. काहीसा असाच प्रकार फरिदाबादमध्ये उघडकीस आला आहे. येथे एका महाठकाने गृहमंत्रालयाचा बनावट संयुक्त सचिव बनून तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या ठकाच्या मुसक्या आवळून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार, चेकबूक आणि संबंधिक कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपीने एका व्यक्तीला धर्मादाय रुग्णालय उघडण्यासाठी परदेशामधून 735 कोटी रुपये देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सेक्टर 18 मधील सैनिक कॉलनीमधील रहिवाशी राजेश जैन हे गेल्यावर्षी सुवेंदु शेखर यांच्या संपर्कात आले होते. आचार्य याने स्वत:ची ओळख भारत सरकारच्या गृहमंत्रालयातील संयुक्त सचिव अशी करून दिली होती. तसेच फिर्यादीला धर्मादाय रुग्णायल उघडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने फिर्यादीला धर्मादाय रुग्णालय उघडण्यासाठी मंजुरी आणि परदेशातून 735 कोटी रुपये निधी मंजुर झाल्याची खोटी कागदपत्रे दिली. तसेच फिर्यादी राकेश जैन आणि त्यांचे निकटवर्तीय बलबीर सिंह यांच्याकडून एक कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले.
त्यानंतर आरोपीने आपला फोन बंद केला. तसेच आपल्या कुटुंबासह फरार झाला. अखेर राजेश जैन यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत सुवेंदू शेखर आचार्य ऊर्फ मातरू प्रसाद सेठी याच्या मुसक्या आवळल्या. हा आरोपी ओदिशामधील रहिवाशी आहे. तसेच त्याच्यावर बाडबील (ओदिशा) आणि मथुरा (उत्तर प्रदेश) येथेही एक एक खटला सुरू आहे. सुवेंदूच्या मुसक्या आवळल्यानंतर तेथील पोलीस ठाण्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुवेंदू हा केवळ 12वी पर्यंत शिकलेला आहे. मात्र तो स्वत:ची ओळख संयुक्त सचिव, एफसीआरए ब्रँच, गृह मंत्रालय, भारत सरकार अशी करून देत तो परदेशातून मदत प्राप्त करू इच्छिणाऱ्या एनजीओ आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असे. त्यानंतर परदेशातून मदतनिधी मंजूर झाल्याची खोटी कागदपत्रे देऊन पैसे उकळत असे.