ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ज्येष्ठ सहकारी आणि बड्या मंत्राने प. बंगाल सरकारमधून दिला राजीनामा
By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 02:16 PM2020-11-27T14:16:38+5:302020-11-27T14:19:28+5:30
West Bengal - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे.
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या आहेत.
पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
West Bengal: Suvendu Adhikari resigns as the state Transport Minister pic.twitter.com/lagBRIrE3w
— ANI (@ANI) November 27, 2020
आपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधील आमदार मिहिर गोस्वामी हे आज भाजपामध्ये दाखल होणार आहेत. खासदार निशीत यांच्या उपस्थितीत ते भाजपाचे सदस्यत्व सीकारणार आहेत. बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पश्चिम बंगालमध्ये कमालीचा अॅक्टिव्ह झाला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्षात येणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.