खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:10 PM2023-04-07T21:10:27+5:302023-04-07T21:10:49+5:30
सध्या पंजाबमध्ये पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
नवी दिल्ली: गेल्या 20 दिवसांपासून फरार असलेला कट्टरपंथी धर्मोपदेशक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचापंजाबमध्ये परतण्याचा अखेरचा प्रयत्नही आज अयशस्वी झाला. आज अकाल तख्तच्या प्रमुखानेही अमृतपालला सरेंडर करण्यास सांगितले आहे. अमृतपाल अखेरचा होशियारपूरमध्ये दिसला होता. यानंतर त्याने एकामागून एक दोन व्हिडिओ जारी करुन सरकारला इशाराही दिला होता.
पंजाबपोलिसांपासून ते केंद्रीय यंत्रणांपर्यंत, सर्वांची नजर आजच्या अकाल तख्तच्या बैठकीवर होती. अकाल तख्तची अमृतपालबाबत भूमिका काय आहे, हे पाहणे महत्वाचे होते. अमृतपालला या बैठकीपासून खूप आशा होती. त्याला वाटले होते की, अकाल तख्त त्याच्या बाजूने असेल, पण त्याला मोठा झटका बसला आहे. तख्तने अमृतपालला सरेंडर होण्यास सांगितले आहे.
सरबत खालसादेखील झाला नाही
फरार अमृतपालला दुसरा झटका तेव्हा बसला, जेव्हा बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा होणार नसल्याचे स्पष्ट झाले. अमृतपाल सरबत खालसाची मागणी करुन धर्माच्या नावाखाली वाचण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, याद्वारे त्याला खलिस्तानी संघटना वारिस पंजाब देमध्ये आपले अस्तित्व टिकवायचे होते. आता दोन्हीकडून निराशा हाती लागल्यानंतर अमृतपालचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पंजाबमध्ये यंत्रणा अलर्टवर
अमृतपाल सरेंडर करणार असल्याची माहिती समोर आल्यापासून पंजाबमध्ये सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. पोलिसांनी सीमेपासून ते सर्व प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत अतिरिक्त सैन्यबळ तैनात केले आहे. ऑपरेशन अमृतपालसाठी ही सर्व तयारी करण्यात आली आहे. आता अमृतपाल कोणत्याही मोठ्या धार्मिक स्थळी आत्मसमर्पण करू शकत नाहीत.