केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:07 AM2023-08-22T11:07:04+5:302023-08-22T12:18:02+5:30
Onion Problem Update: आज मुंडे यांनी दिल्लीत पीयुष गोयल यांची भेट घेतली. गोयल याबाबत थोड्याच वेळात माहिती देणार आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. याविरोधात शेतकरी आणि संघटना केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठली आहे. मुंडे आणि पियुष गोयल यांची चर्चा होत नाही तोवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे.
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे फेकत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्ष देखील मोदी सरकार शेतकऱ्याला संपविण्याची तयारी करत आहे, असा आरोप करत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी मुंडे यांनी आपण केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते.
आज मुंडे यांनी दिल्लीत पीयुष गोयल यांची भेट घेतली. गोयल याबाबत थोड्याच वेळात माहिती देणार आहेत. परंतू, जपानमध्ये असलेल्या फडणवीस यांनी ट्विट करून केंद्र सरकार कांद्याची खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह आणि पीयुष गोयल यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
केंद्र सरकार 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
नाफेडने तीन लाख टन कांदा ११ ते १५ रुपये प्रति किलोने कांदा खरेदी केला आहे. यापुढील कांदा हा विक्रमी दराने खरेदी केला जाणार आहे. मी केंद्राला दोन लाख टनांपेक्षाही जास्त कांदा आला तर तो देखील याच दराने खरेदी करावा अशी मागणी केली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.