तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:52 IST2024-06-26T18:52:20+5:302024-06-26T18:52:31+5:30
Tamilnadu MLA Suspension News: एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला.

तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृतांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. अशातच विधानसभेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या व प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून यावर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष एआयडीएमकेच्या सर्व आमदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
तमिळनाडूचे सभापती एम अप्पावू यांनी विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या AIADMK आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. AIADMK आमदारांनी प्रश्नोत्तरांचे सत्र तहकूब करण्याची मागणी केली होती. मंगळवारी काही आमदारांना निलंबित करण्यात आले होते. बुधवारी सकाळीच कामकाज सुरु होताच गोंधळ घालणाऱ्या सर्व आमदारांना निलंबित करण्यात आले.
एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. यानुसार तामिळनाडूचे विरोधी पक्ष नेते इडाप्पाडी पलानीस्वामी आणि इतर AIADMK आमदारांना या संपूर्ण विधानसभा अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृह नेते टी.एन. जलसंपदा मंत्री दुराईमुरुगन यांनी विधानसभेच्या नियमांच्या 121 (20) अंतर्गत यासंदर्भात ठराव मांडला होता. हे अधिवेशन २९ जून रोजी संपणार आहे.
आरोपीला अटक...
आरोपी के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात प्राणघातक 'मेथनॉल' असल्याचे स्पष्ट झालं आहे.