विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठा वाद, बड्या नेत्याला केले पक्षातून निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:57 PM2023-09-13T14:57:41+5:302023-09-13T14:58:00+5:30
BJP News: राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे.
राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. कैलाश मेघवाल हे गेल्या काही काळापासून सातत्याने केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर टीका करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आजही जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपामध्ये गटबाजी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कैलाश मेघवाल हे वसुंधरा राजे गटातील नेते मानले जातात.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर सार्वजनिक मंचावरून आरोप केल्यानंतर कैलाश मेघवाल यांना पक्षाने कारणे दाखवा नोटिस बजावली होती. तसेच त्यांना दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कैलाश मेघवाल यांनी आज पुन्हा प्रेस कॉन्फ्रन्स घेत अर्जुनराम मेघवाल यांच्यावर आरोप केले होते. तसेच पक्षात गटबाजी असल्याचा दावा केला होता.
कैलाश मेघवाल यांच्या निलंबनाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर प्रभारी अरुण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेईन आणि नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. कैलाश मेघवाल यांच्या निलंबनानंतर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कुठलाही नेता याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहे.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेघवाल म्हणाले की, मी वसुंधराजींना काहीही बोलणार नाही. मात्र कधीकाळी मी हीरो होतो. आता झीरो झालो आहे. पक्षामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. माझ्या पक्षातील काही लोक अर्जुनराम मेघवाल यांची तुलना डॉ. आंबेडकर यांच्याशी करत आहेत. हे केवळ त्यांचं महिमामंडन करण्यासाी केलं जातंय. मी राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढेही राहीन. मी सार्वजनिकपणे वसुंधरा राजे यांच्यावर कुठलाही आरोप कधीही केलेला नाही.
ते पुढे म्हणाले की, मी भाजपामध्ये आहे. मोदींवर माझी कुठलीही नाराजी नाही आहे. माझी राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे. माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. माझ्यावर अन्याय होतोय. सध्या भाजपा गटबाजीमध्ये विखुरली आहे. तसेच वसुंधरा राजे गटाला समाप्त करण्याचेही प्रयत्न होत आहेत.