अरुण जेटलींच्या कार्यकाळात डीडीसीएत मोठा भ्रष्टाचार - आपचा आरोप
By admin | Published: December 17, 2015 01:06 PM2015-12-17T13:06:07+5:302015-12-17T14:47:08+5:30
अरुण जेटली दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना डीडीसीएचे अध्यक्ष असताना मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना डीडीसीएचे अध्यक्ष असताना मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील डीडीसीएच्या फाईलसाठीच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे.
१९९९ ते २०१४ या १५ वर्षात बनावट कंपन्या बनवून डीडीसीएमधून पैसा काढण्यात आल्याचा गंभीर आरोप आप नेते कुमार विश्वास यांनी केला. आम्ही हे प्रकरण भ्रष्टाचार विरोधी शाखेकडे सोपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे प्रकरण आमच्याकडून काढून घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली. त्यांच्या रोजच्या डाय-या नेण्यात आल्या असे कुमार म्हणाले.
अरुण जेटलींना घोटाळयातून वाचवण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचा आपने दावा केला आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी आपने मागणी केली आहे.
काय आहेत आपचे आरोप
अरुण जेटलीच्या कार्यकाळात डीडीसीएच्या स्टेडियमच्या बांधणीसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले होते. ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. उरलेले ९० कोटी कुठे गेले ?
डीडीसीएतून पैसा काढण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. डीडीसीएने १ कोटी ५५ लाखाचे कर्ज तीन कंपन्यांना दिले, कर्ज देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही
ज्या कंपन्यांनी काम केले नाही त्यांनाही डीडीसीएतून पैसा देण्यात आला
डीडीसीएचे खजिनदार नरेंद्र बत्रा यांच्याबरोबर अरुण जेटलींचे काय संबंध आहेत ? ते जेटलीनी जाहीर करावेत.
निष्पक्ष सुनावणीसाठी अरुण जेटलींनी राजीनामा द्यवा