‘राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:09 AM2018-08-13T06:09:26+5:302018-08-13T06:09:48+5:30
राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
नागपूर : राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहितीच दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल
२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादन प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.