टॅब वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार : संजय निरुपम यांचा आरोप
By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30
Next
>मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठीचे टॅब घेताना निविदा प्रकरणाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले असून यात २३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. बाजारात अन्य कंपन्यांचे उच्च दर्जाचे टॅब उपलब्ध असताना केवळ व्हिडिओकॉन कंपनीचे महागडे टॅब चढ्या दरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. महापालिका आयुक्तांनी ही निविदा रद्द करावी, अन्यथा या विरोधात केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पालिकेने यासाठी ग्लोबल निविदा मागवण्याची गरज होती मात्र शिवसेनेने व्हिडिओकॉनच्या टॅबची सेल्समनशीप केली व कालबा टॅब खपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. महापालिकेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी सध्या २२,७९९ टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. व्हिडिओकॉनचे मालक राजकुमार धूत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत त्यामुळे व्हिडिओकॉनला मदत पोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस विद्यार्थ्यांना टॅब देण्याविरोधात नाही. मात्र त्याची योग्य पध्दत असायला हवी. मनमानी पध्दतीने मर्जीतील कंपनीला कंत्राट देणे अयोग्य आहे. महापालिका आयुक्त जर या घोटाळ्यात सहभागी नसतील तर त्यांनी त्वरित याची निविदा रद्द करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. ३५००रुपयांना चांगल्या कंपनीचे टॅब मिळत असताना व्हिडिओकॉनचे टॅब ६८५० रुपयांना घेण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेट्रो भाडेवाढीबाबतच्या निणर्याचा निरुपम यांनी निषेध केला. या निणर्याविरोधात राज्य सरकारने अपील करावे, अशी मागणी निरुपम यांनी केली. मेट्रो कायद्यामध्ये सुधारणा करावी व नागरिकांना न्याय द्यावा तसेच तिकीट दर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा असे संजय निरुपम म्हणाले.