लॉकडाऊनमध्ये Jio चे नशीब फळफळले; फेसबुकने 43574 कोटी रुपये गुंतवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 08:38 AM2020-04-22T08:38:47+5:302020-04-22T08:39:13+5:30
फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे जिओचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये झाले आहे.
नवी दिल्ली : लॉकडाऊनकाळात सर्वत्र बंदी असताना रिलायन्स जिओचे नशीब फळफळले आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकमध्ये मोठा व्यवहार झाला आहे. फेसबुकने जिओचा ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याद्वारे फेसबूक ४३५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. या घोषणेमुळे फेसबुक जिओची आता सर्वात मोठी शेअरधारक बनली आहे.
फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे जिओचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये झाले आहे. माइनॉरिटी इन्वेस्टमेंटनुसार ही गुंतवणूक आतापर्यंतची सर्वाधिक प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सहकार्यामुळे देशात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि व्यवसायही वाढणार आहे.
फेसबुकने सांगितले की, ही गुंतवणूक भारताच्या प्रति आमची कटीबद्धता दाखविते. जिओने भारतात क्रांती केली आहे. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. अवघ्या ४ वर्षांत जिओने ३८ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना ऑनलाईन प्लॅटफ़ॉर्मवर आणले आहे. यामुळे आम्ही जिओच्या मदतीने भारतात आधीपेक्षा जास्त लोकांसोबत जोडले जाणर आहोत.
गेल्या महिन्यात मीडिया रिपोर्टनुसार फेसबूक रिलायन्समध्ये काही अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त होते. यामध्ये १० टक्के हिस्सा घेण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
आणखी वाचा
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल