भाविक भक्तांसाठी तिरुपती बालाजी मंदिर समितीचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:02 PM2020-01-20T16:02:33+5:302020-01-20T16:03:26+5:30
मंदिर समितीकडून सद्यस्थितीला एका दिवसात 20 हजार लाडूंचा प्रसाद देण्यात येतो.
तिरुमाला - देशातील सुप्रसिद्ध देवस्थान आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरातील व्यवस्थापन समितीने भक्तांना आनंद देणार निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आजपासून लाडूचा प्रसाद मोफत स्वरुपात देण्यात येणार आहे. तिरुमाला येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी असते, तर सणा आणि शुभदिवसाच्या मुहुर्तावर लाखो भाविक दर्शनासाठी मोठी रांग लावतात.
मंदिर समितीकडून सद्यस्थितीला एका दिवसात 20 हजार लाडूंचा प्रसाद देण्यात येतो. त्यामध्ये पायी येणाऱ्या भक्तांसाठी 175 ग्रॅमचा लाडू तर इतर भक्तांसाठी 40 ग्रॅमचा लाडू देण्यात येत होता. आता, नवीन नियमावलीनुसार 175 ग्रॅमचे 80 हजार लाडू भक्तांसाठी प्रसाद म्हणून मोफत वाटण्यात येणार आहेत. मात्र, जर एखाद्या भक्ताने अतिरिक्त लाडूचा मागणी केल्यास, त्यास एका लाडूसाठी 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार असल्याचे तेथील समिती व्यवस्थापकाने सांगितले. 31 डिसेंबर रोजीच मंदिर व्यवस्थापनाकडून मोफत लाडू संदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्याची, अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी फक्त पायी येणाऱ्या भाविक भक्तांनाच मोफत लाडू देण्यात येत होता. मात्र, आता सर्वच भक्तांना प्रसादाचा लाडू मोफत देण्यात येणार आहे. एका, आकडेवारीनुसार दररोज जवळपास 60 ते 70 हजार भाविक भक्त तिरुपतींच्या दर्शनाला येतात. तर, सुट्टीच्या दिवशी ही संख्या अजून वाढते. त्यामुळे, मंदिर समितीने प्रसादाचे लाडू वाढविण्याचा आणि मोफत देण्याचा निर्णय घेतला.