यूपीत भाजपाच्या मतांत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:10 AM2018-06-02T05:10:49+5:302018-06-02T05:10:49+5:30

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर व आता कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे राज्यात विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळाले

Big differences in BJP's opinion in UP | यूपीत भाजपाच्या मतांत मोठी घट

यूपीत भाजपाच्या मतांत मोठी घट

लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर व आता कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे राज्यात विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळाले असून,  हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला ८0 पैकी केवळ १९ जागा मिळतील, असे एबीपी न्यूजने आकडेवारीच्या आधारे म्हटले आहे. भाजपाला २0१४ साली ८0 पैकी ७१ जागांवर विजय मिळाला होता.

उत्तर प्रदेशात भाजपाला २0१४ सारखी अनुकुल स्थिती राहिलेली नाही. विरोधी पक्षही एकत्र येताना दिसत आहेत. गोरखपूर व फुलपूरमध्ये सपा, बसपा व काँग्रेस एकत्र आले होते, तर कैरानामध्ये राष्ट्रील लोक दलाच्या उमेदवाराला या तीन पक्षांनी पाठिंबा दिला. विरोधी ऐक्यामुळेच भाजपाचा पराभव शक्य झाला, कारण यावेळी मतांची फाटाफूट झाली नाही.

भाजपाला २0१४ साली मिळालेल्या विजयाचे मुख्य कारण अन्य पक्षांच्या मतांची झालेली विभागणी होते. त्यावेळी भाजपाप्रणित रालोआला ४३ टक्के मते मिळाली होती, तर समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या मतांची एकत्रित टक्केवारी होती ४२ टक्के. याखेरीज काँग्रेसला १२ व अन्य पक्षांना ७ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच रालोआपेक्षा या पक्षांच्या मतांचे प्रमाण खूपच अधिक असूनही मतविभागणीचा फायदा भाजपाला मिळाला. कैरानामध्ये भाजपाच्या मतांचे प्रमाणही पाच ते आठ टक्क्यांनी कमी झाले गौरखपूर व फुलपूरमध्येही असेच घडले. सपा व बसपाला मिळून ४६ टक्के मते मिळाली. यामध्ये काँग्रेस व अन्य पक्षांची मते गेल्यास विरोधकांची मते ६0 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात.

पक्षांतर्गत बंडखोरी टळणे आवश्यक
एकीकडे भाजपाच्या मतांत पाच ते आठ टक्के झालेली घट व विरोधी मतांचे टळलेले विभाजन यांमुळे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका भाजपाला फार सोप्या राहिलेल्या नाहीत, असाच अर्थ निघतो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकांच्या वेळी विरोधकांची ही एकजूट कायम राहणे व पक्षांतर्गत बंडखोरी टळणे या दोन गोष्टी आवश्यक आहेत. विरोधकांची मते फुटावीत, यासाठी भाजपा विरोधी पक्षांचे नेते त्यावेळी फोडण्याची दाट शक्यता आहे.

अजित सिंग यांचा रालोद लोकसभेत
कैरानामधील विजयामुळे लोकसभेमध्ये राष्ट्रीय लोक दलाला प्रवेश मिळाला आहे.
अजित सिंग यांच्या रालोआचा आतापर्यंत लोकसभेत एकही प्रतिनिधी नव्हता. उत्तर प्रदेश विधानसभेतही या पक्षाला प्रतिनिधीत्व नाही.

Web Title: Big differences in BJP's opinion in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.