Nitin Gadkari: दिल्लीला जायचे नव्हते, सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर मोठा ईगो; नितीन गडकरींनी कोणाला ऐकवले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:27 PM2021-10-26T13:27:46+5:302021-10-26T13:28:33+5:30
Nitin Gadkari talk on Ego in Government higher stage: जेव्हा दिल्लीला यायचो तेव्हा रात्रीचे विमान पकडून पुन्हा मुंबई गाठायचो. जेव्हा मी दिल्लीला रहायला आलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणालो की मला देश विदेशातील लोकांना भेटायला मिळते. बोलायला मिळते, असे सांगत गडकरींनी दिल्लीतील वास्तव मांडले.
बोलण्यामध्ये कोणाची भीडभाड न ठेवणारे व्यक्तीमत्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari). त्यांनी एका कार्यक्रमात सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर मोठा ईगो असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांनी हे कोणाला ऐकवले याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की, खूप ठिकाणी इगो असतो. खासकरून सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर मोठा असतो. त्यांना वाटते त्यांना सारे माहिती आहे. कोणाकडून सल्ला घ्यावा, त्याचे ऐकावे हे होत नाही. आपल्यामध्येही काही कमी नाही आहे, आपणच सर्वगुण संपन्न आहे असे वाटून घेतात. दुसऱ्याकडून काही ऐकावे असे त्यांना वाटत नाही. आपल्यामध्ये देखील काही कमतरता आहे, या भावातून दुसऱ्यांचे ऐकून घेतल्याने खूप माहिती मिळते.
यानंतर गडकरींनी दिसते तसे नसते असे म्हटले. मला कधीही दिल्लीला यायचे नव्हते. अपघाती मी दिल्लीला आलो. मी जेव्हा राज्य सरकारमध्ये होतो तेव्हा मला इथे अडजस्ट होता येत नव्हते. यामुळे जेव्हा दिल्लीला यायचो तेव्हा रात्रीचे विमान पकडून पुन्हा मुंबई गाठायचो. जेव्हा मी दिल्लीला रहायला आलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणालो की मला देश विदेशातील लोकांना भेटायला मिळते. बोलायला मिळते, असे सांगत गडकरींनी दिल्लीतील वास्तव मांडले.
मी ज्यांना खूप मोठा समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यावर असे समजले की जेवढा मी त्यांना मोठा समजत होतो तेवढे ते नाहीत आणि ज्यांना मी छोटा समजत होतो, ते तेवढे छोटे नव्हते. जेव्हा आपण सरकारमध्ये, सत्तेमध्ये मोठ्या पदावर जातो, तेव्हा तुमच्या आजुबाजुला तुमची स्तुती करणारे वाढू लागतात. पण या व्यक्तीने निंदा करणारे व्यक्ती सोबत ठेवायला हवेत, असा सल्लाही गडकरी यांनी दिला.