लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 21:11 IST2024-06-02T21:09:55+5:302024-06-02T21:11:39+5:30
Toll Rate Hike: एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली जाणार आहे. यानुसार प्रत्येक टोलमागे ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. देशभरात जवळपास ११०० टोलनाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यामुळे टोलच्या दरात संशोधन करण्यात आल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन या कंपन्यांना होणार आहे. भारतात जवळपास 146,000 किमी लांबीचे महामार्ग आहेत. यामध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 2018/19 मधील 252 अब्ज रुपयांवरून 2022/23 आर्थिक वर्षात टोल संकलन 540 अब्ज रुपये ($6.5 अब्ज) पेक्षा जास्त झाले आहे. रस्ते वाहतूक, वाहने वाढल्याने तसेच टोलमध्ये वाढ केल्याने संकलनात एवढी मोठी वाढ झाली आहे.