पाटण्यात मोठा गोंधळ! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एसपीसह अनेक पोलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 04:23 PM2022-07-03T16:23:10+5:302022-07-03T16:23:20+5:30
सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली 70 घरे पाडण्यासाठी पथक गेले होते, यावेळी स्थानिकांनी दगफेक केली.
पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यात अतिक्रमण हटवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शहराचे एसपी अमरीश राहुल यांच्यासह अनेक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना शहरातील राजीव नगरमध्ये घडली आहे. या परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी 17 जेसीबी लावण्यात आले आहेत. तसेच, 2000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतरही पोलिसांची कारवाई सुरू आहे. पाटण्याचे जिल्हाधिकाहीदेकील घटनास्थळी पोहोचले आहेत. राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगरमधील 70 घरांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी सांगितले की, अतिक्रमण करतेवेळी स्थानिकांनी घराच्या छतावरुन दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. नेपाळी नगरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परिस्थिती नियंत्रणात - डीएम
पाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अतिक्रमणाची कारवाई सुरुच राहणार आहे. आम्ही कोणत्याही किंमतीत जमीन आमच्या ताब्यात घेऊ. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 12 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजवरून उर्वरित हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमकं काय प्रकरण आहे?
राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगर परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेली 70 घरे पाडण्याचे काम सुरू आहे. ही सर्व 70 घरे गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या सर्व लोकांना यापूर्वीच अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. त्यांना घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, अतिक्रमण हटवण्यास तयार न झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली.