आपलेच हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक, हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:17 AM2019-10-05T05:17:49+5:302019-10-05T05:18:40+5:30
काश्मीरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाईदलाने आपलेच हेलिकॉप्टर पाडल्याची घटना एक मोठी चूक होती, अशा शब्दांत हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी यावर खंत व्यक्त केली.
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाईदलाने आपलेच हेलिकॉप्टर पाडल्याची घटना एक मोठी चूक होती, अशा शब्दांत हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी यावर खंत व्यक्त केली. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवाईदलाकडून पाकिस्तानी सीमेत बालाकोटमध्ये हवाईहल्ला केल्यानंतर पाकिस्तानने काश्मिरात २७ फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता. याचवेळी दोन्ही देशांच्या हवाईदलात संघर्ष झाला होता.
भारतीय हवाईदलाने बडगाममध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी आपलेच एमआय-१७ हेलिकॉप्टर पाडले होते. यात ६ जवानांचा मृत्यू झाला होता. यावर बोलताना भदौरिया म्हणाले की, आमच्याकडून झालेली ही मोठी चूक होती.
ते म्हणाले की, कोर्ट आॅफ इन्क्वायरीने आपला अहवाल सोपविला आहे. हवाईदल दोषींविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत आहे. दोन अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.
काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊ न जाणाºया वाहनावर १४ फेब्रुवारी महिन्यात जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे ४0 जवान शहीद झाले होते आणि ३५ जण जखमी झाले होते. त्यानंतर १२ दिवसांनी हवाई दलाने बालाकोटमधील त्या संघटनेचे अड्डे नष्ट केले होते. त्या हवाई हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या पाच वैमानिकांना हवाई दलाने सर्वोच्च सन्मानाद्वारे गौरविले होते.
नेमके काय झाले?
बडगाममधून २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. यावेळी भारतीय व पाकिस्तानी लढाऊ विमानांत नौशेरात हवाई संघर्ष सुरु होता. सूत्रांनी सांगितले की,श्रीनगरमधील हवाई संघर्ष पाहता या हेलिकॉप्टरला परत येण्यास सांगितले होते.
या हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. कारण, हवाई दलाच्या ग्राऊंड स्टाफला वाटले की, हे दुश्मनांचे हेलिकॉप्टर आहे. उड्डाण घेतल्यानंतर दहा मिनिटांतच हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.
हवाईदलाच्या मुख्यालयाने या प्रकरणाच्या कोर्ट आॅफ एन्क्वायरीचे आदेश दिले होते. तपासात असेही दिसून आले की, ग्राउंड स्टाफ आणि हेलिकॉप्टरचे चालक दल यांच्या सदस्यांत समन्वयाचा अभाव
होता.
बालाकोट हल्ल्याचा व्हिडिओ जारी
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या बालाकोटमध्ये २६ फेब्रुवारी रोजी केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती देणारा व्हिडिओ भारतीय हवाई दलाने शुक्रवारी जारी केला आहे. बालाकोटमधील दहशतवादी तळांवर त्या दिवशी हा एअर स्ट्राइक करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये हवाई दलाच्या विमानांची उड्डाणे आणि दहशतवादी तळांवर केलेले हल्ले दाखवण्यात आले आहे. हवाई दलानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत एअर चिफ मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी तो सर्वांना दाखवला. हवाई दलातर्फे २६ फेबु्रवारी रोजी पहाटे पावणेचार वाजता जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर जोरदार हवाई हल्ला चढवला होता.
स्पाइस बॉम्बचा वापर
हवाई दलाच्या मिराज-२000 या लढाऊ विमानांनी हा हल्ला केला होता. त्यासाठी हवाई दलाची विमाने नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आठ किलोमीटर आत गेली होती. या विमानांनी स्पाइस-२000 या प्रकारचे बॉम्ब त्या तळांवर टाकले होते.