राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेत मोठी चूक, व्हॉट्सअॅपवर लीक झाली सुरक्षेची संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:27 PM2021-11-25T12:27:07+5:302021-11-25T12:27:20+5:30
या प्रकारानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कानपूर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या कानपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा या शहरात दुसरा दिवस आहे. मात्र यादरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील काही कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर लीक झाली आहेत, ज्यामध्ये त्यांच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी बुधवारी सांगितले की, रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याविषयीची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाली आहे. या प्रकारानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. असीम अरुण म्हणाले की, अतिरिक्त पोलीस उपायुक्त(वाहतूक) राहुल स्वीटी यांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, त्यांना कागदपत्र सार्वजनिक करण्याऱ्या लोकांची ओळख पटवून या कृत्यामागील वस्तुस्थिती आणि हेतू तपासण्यास सांगितले आहे.
कोणती माहिती लीक झाली ?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर मिळालेल्या माहितीमध्ये राष्ट्रपतींना दिलेली सुरक्षा, त्यांचा ताफा, सर्व ठिकाणी सैन्याची तैनाती आणि अगदी सर्व पोलीस कर्मचार्यांची नावे, पदनाम आणि संपर्क क्रमांक आणि त्यांची भूमिका यांचा समावेश आहे. ही अतिशय संवेदनशील माहिती लीक झाल्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रपतींचा कानपूर दौरा
शौर्य चक्र विजेते आणि माजी खासदार चौधरी हरमोहन सिंग यादव यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती कोविंद बुधवारी दोन दिवसीय कानपूर दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी चकेरी विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. कोविंद गुरुवारी हार्कोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक, मद्यधुंद अवस्थेत जोडपे घुसले
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक झाल्याचे समोर आले होते. अतिशय हायसेक्युरिटी असलेल्या राष्ट्रपती भवनात रात्रीच्या वेळी दारू पिलेले दोघेजण घुसल्याची घटना घडली होती. एक मुलगा आणि मुलगी मध्यरात्री कारमधून राष्ट्रपती भवनात घुसले होते. राष्ट्रपती भवनात घुसून बराचवेळ दोघे फिरले. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. राष्ट्रपती भवनात घुसणे ही अतिशय गंभीर आणि संवेदनशील बाब आहे.