मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीतील बॉम्बस्फोट प्रकरणी 9 आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:21 PM2021-10-27T15:21:10+5:302021-10-27T15:21:22+5:30
Patna Gandhi Maidan Blast:27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाला होता.
पाटणा:बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणाची NIA कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. पाटणाच्या या प्रसिद्ध प्रकरणातील 10 आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर इतर 9 जणांना दोषी ठरवलं आहे. आरोपींमध्ये उमर सिद्दीकी, अझहर कुरेशी, अहमद हुसैन, फिरोज अस्लम, इफ्तेखार आलम यांचा समावेश आहे. न्यायालयाने फकरुद्दीन या एका आरोपीची सुटका केली. या प्रकरणात आता शिक्षेच्या मुद्यांवर 1 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाला होता. भाजपच्या हुंकार रॅलीदरम्यान साखळी बॉम्बस्फोटांमुळे चेंगराचेंगरी झाली होती. या स्फोटावेळी नरेंद्र मोदींसह सर्व नेते गांधी मैदानात उपस्थित होते. गांधी मैदानापूर्वी पाटणा जंक्शनवरही स्फोट झाला होता. पाटणा येथे झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 84 जण जखमी झाले होते.
या आरोपींना अटक
पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने दुसऱ्याच दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि वर्षभरात 21 ऑगस्ट 2014 रोजी एकूण 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर एनआयएच्या पथकाने याप्रकरणी हैदर अली, नोमान अन्सारी, मोहम्मद, मुजीबुल्ला अन्सारी, इम्तियाज आलम, अहमद हुसेन, फकरुद्दीन, मोहम्मद. फिरोज अस्लम, इम्तियाज अन्सारी, मो. इफ्तिकार आलम, अझरुद्दीन कुरेशी आणि तौफिक अन्सारी यांना अटक केली.
हैदर अली आणि मोजिबुल्ला हे पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार होते. त्या दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरुनच अटक केले होते. त्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हुंकार रॅलीत मोठा स्फोट घडवून आणण्यासाठी तो त्याच्या संपूर्ण टीमसह गांधी मैदानावर पोहोचल्याचे त्याने चौकशीत सांगितले होते.
एनआयएच्या पथकाने अटक केलेल्या दहशतवादी इम्तियाजची कडक चौकशी सुरू केली तेव्हा त्याने अनेक नावे सांगितली. यानंतर तपास यंत्रणेने मास्टर माइंड मोनू उर्फ तहसीनसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. यानंतर बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणातही मोठी माहिती या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली होती.