मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:15 PM2024-06-20T20:15:37+5:302024-06-20T20:34:44+5:30
Arvind Kejriwal Bail: दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता.
अबकारी घोटाळ्यात ईडीने अटक केलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. राऊज अव्हेन्यू कोर्टाच्या या निर्णयामुळे ईडीला झटका बसला असून आपला मोठा दिलासा मिळाला आहे.
राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला परवानगी दिली आणि त्यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ईडीने केजरीवालांच्या जामीनाला ४८ तासांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. ती देखील कोर्टाने फेटाळली आहे.
दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. तेव्हा त्यांना सहा दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविण्यात आले होते. आठ ते नऊ नोटीसांना केजरीवाल हजर न झाल्याने ईडीने ही कारवाई केली होती. ही अटक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने आपने केजरीवालांचा जामीन मागितला होता. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. निकाल लागण्यापूर्वी केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते. आज पुन्हा केजरीवालांना जामीन मिळाला आहे.