मोठी बातमी: हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना; ईडीची टीमही निवासस्थानी दाखल, अटक होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:12 AM2024-01-29T11:12:52+5:302024-01-29T11:15:03+5:30
ईडीकडून २८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा समन्स आल्यानंतर हेमंत सोरेन हे नवी दिल्लीतील आपल्या शांती निकेतन या निवासस्थानी गेले होते.
Hemant Soren ( Marathi News ) :झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच काही वेळापूर्वी ईडीची टीम मुख्यमंत्री सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान सोरेन यांना अटक होऊ शकते, अशी शक्यतही वर्तवली जात आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू असून ईडीने सोरेन यांच्याकडे २९ ते ३१ जानेवारीदरम्यान चौकशीसाठी वेळ मागितली होती. मात्र २८ जानेवारी रोजी ईडीचं पुन्हा एकदा समन्स आल्यानंतर हेमंत सोरेन हे नवी दिल्लीतील आपल्या शांती निकेतन या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी ईडीचे अधिकारीही शांती निकेतन इथं पोहोचले आहेत.
अचानक दिल्लीत का पोहोचले हेमंत सोरेन?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित नव्हता. मात्र २८ जानेवारी रोजी पुन्हा ईडीचं समन्स आल्यानंतर सोरेन अचानक दिल्लीकडे रवाना झाले. खरंतर २९ जानेवारी रोजी चाईबासा इथं, ३० जानेवारी रोजी पलामू इथं आणि ३१ जानेवारी रोजी गिरीडीह इथं सोरेन यांच्या कार्यक्रमांचं नियोजन होतं. मात्री ईडी नोटिसीनंतर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे समजते.
दरम्यान, सदर जमीन घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत तब्बल १४ जणांना अटक केली आहे. यामध्ये २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी छवि रंजन यांचाही समावेश आहे. ते झारखंडच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि रांचीचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते.