मोठी बातमी : सर्व देशवासीयांना कोरोनावरील लस मोफत मिळणार, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: January 2, 2021 12:10 PM2021-01-02T12:10:19+5:302021-01-02T12:40:05+5:30
Corona Vaccine India Update : देशात कोरोनावरील लस ही मोफत असेल की त्याला शुल्क मोजावे लागणार अशी चर्चा सुरू झाली होती.
नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशात कोरोनावरील लसीकरणाच्या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, देशात कोरोनावरील लस ही मोफत असेल की त्याला शुल्क मोजावे लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस ही मोफत दिली जाईल, अशी घोषणा डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.
आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना कोरोनावरील लसीच्या शुल्काबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी केवळ दिल्लीच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे कोरोनावरील लसीकरणाबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे.
#WATCH | Not just in Delhi, it will be free across the country: Union Health Minister Dr Harsh Vardhan on being asked if COVID-19 vaccine will be provided free of cost pic.twitter.com/xuN7gmiF8S
— ANI (@ANI) January 2, 2021
दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी व्यापक मोहीम केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी सरकारकडून करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील लोकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. या लसीकरणाची ड्राय रन आज देशभरात सुरू आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनावरील लसीकरणाची ड्राय रन सुरू आहे.
कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज - राजेश टोपे
दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज असून प्रशासणाची तयारी बघण्यासाठी आजची रंगीत तालीम होती असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सिरम लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. लसीकरण झाल्यानंतर पेशंटला काही त्रास होतो का काही अडथळे येतात का त्यासाठी आज रंगीत तालीम झाल्याचं देखील टोपे यांनी म्हटले.8 कंपन्या पैकी 2 कंपन्यांच्या वॅक्सिन तयार असून ड्रग अँथोरिटीची परवानगी मिळणं गरजेची आहे असंही टोपे म्हणाले