मोठी बातमी! गौतम गंभीरला एका आठवड्यात तिसऱ्यांदा ISIS कडून जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:54 AM2021-11-28T11:54:01+5:302021-11-28T11:54:09+5:30
गौतम गंभीरला पाठवलेल्या धमकीच्या मेलमध्ये लिहिले की- 'दिल्ली पोलीस आणि IPS श्वेता काहीही करू शकत नाहीत. आमचे हेर दिल्ली पोलिसात, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे.
नवी दिल्ली: पूर्व दिल्लीचे भाजप खासदार आणि आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIS) काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला पाठवलेल्या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असंही त्या मेलमध्ये लिहीलं आहे.
एकाच आठवड्यात तिसरी धमकी
गौतम गंभीरला आठवडाभरात मिळालेली ही तिसरी धमकी आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या. 23 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. पण 24 तारखेला त्याला पुन्हा एक ईमेल आला, ज्यामध्ये 'काल तुला मारणार होतो पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा' असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला ISIS काश्मीरने दिल्याचा आरोप आहे.
धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आला
गंभीरला आलेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली होती. ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला, त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅड्रेसही सापडला आहे. विशेष म्हणजे, फक्त गौतम गंभीरच नाही तर इतरही अनेकांना दहशतवादी संघटना ISIS च्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर अनेक यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.