मोठी बातमी! भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:45 PM2021-11-11T12:45:10+5:302021-11-11T12:46:16+5:30
येत्या महिन्याभरात या गोळीच्या वापरावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
नवी दिल्ली: सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या COVID-19 रुग्णांच्या उपचारासाठी मर्कची अँटीव्हायरल गोळी मोलनुपिरावीरला (Merck's antiviral pill Molnupiravir) काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, CSIR चे अध्यक्ष डॉ. राम विश्वकर्मा यांनी एका वृत्त वाहिनीला ही माहिती दिली. ते म्हणाले, ही गोळी अशा लोकांसाठी आहे, ज्यांना गंभीर COVID-19 आहे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आहे. या गोळीशिवाय फायझरची गोळी पॅक्सलोविडला आणखी काही वेळ लागू शकतो. या दोन कंपन्यांच्या गोळ्या बाजारात आल्यानंतर मोठा फरक पडेल आणि महामारी संपवण्याच्या दिशेने मोठी वाटचाल करू. ही गोळी लसीकरणापेक्षाही मोठी परिणामकारक सिद्ध होऊ शकते.
लवकरच यावर निर्णय घेतला जाईल
ते पुढे म्हणाले की, मला वाटतं की, मोलनुपिरावीर लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होईल. औषध निर्मात्यांसोबत पाच कंपन्या काम करत आहेत. मला वाटतं की कोणत्याही क्षणी यो गोळ्यांच्या वापरासाठी मान्यता मिळेल. ब्रिटनमध्ये या गोळीच्या वापरण्यास परवानगी दिल्यानंतर एसईसी त्यावर लक्ष ठेवत आहे. अशा स्थितीत लवकरच भारतातही या गोळीच्या वापरासाठी परवानगी मिळेल. येत्या महिनाभरात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सुरुवातीला या गोळीची किंमत 2000 ते 3000 हजार किंवा संपूर्ण उपचारासाठी 4000 रुपये असू शकते. मात्र, नंतर ही किंमत 500 ते 600 किंवा 1,000 रुपयांपर्यंत खाली येईल.
फायझरचे कोरोना गोळ्यांवर काम सुरू
Pfizer ने एक निवेदन जारी केले आहे की, क्लिनिकल चाचण्यांनुसार त्यांची Paxlovid गोळी गंभीर रुग्णांमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करते. मर्कने यापूर्वीच पाच कंपन्यांशी करार केला आहे. ज्याप्रमाणे Merck ने अनेक कंपन्यांना हा परवाना दिला आहे, त्याचप्रमाणे Pfizer देखील औषधाच्या जागतिक वापरासाठी भारतीय क्षमतेचा वापर करू इच्छित आहे.