मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:00 IST2024-12-20T10:00:38+5:302024-12-20T10:00:53+5:30
Jagdeep Dhankhar News: अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य केल्याने संसदेतील वातावरण आधीच तापलेले असताना आता धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने त्याचे पडसाद आज एकत्रच उमटण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...
चुकीची वागणूक देत असल्याचे आरोप करत विरोधकांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला होता. यावर उप सभापतींनी एकेक चूक सांगत ती नोटीस फेटाळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी-विरोधक एकमेकांना कात्रीत पकडत आहेत. बुधवारी राहुल गांधींना संसदेत प्रवेश करण्यास अटकाव केल्याने झालेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी झाले होते. यामुळे भाजपाने राहुल यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य केल्याने संसदेतील वातावरण आधीच तापलेले असताना आता धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने त्याचे पडसाद आज एकत्रच उमटण्याची शक्यता आहे.
धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी विरोधी पक्षांनी कलम 67B अंतर्गत नोटीस दिली होती. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी विरोधकांची ही नोटीस फेटाळून लावत वस्तुस्थितीला धरून नसल्याचे म्हटले आहे. राज्यसभेचे सरचिटणीस पी सी मोदी यांना सादर केलेल्या आपल्या निर्णयात हरिवंश म्हणाले की, देशाच्या संवैधानिक संस्थांची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी आणि विद्यमान उपराष्ट्रपती धनखड यांची प्रतिमा डागाळण्यासाठी ही नोटीस तयार करण्यात आली होती.
या नोटीसमध्ये अनेक चुका आहेत. निष्काळजीपणे ती बजावण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला ही नोटीस देण्यात आली त्या व्यक्तीचा यात उल्लेख नाहीय. संपूर्ण नोटीसमध्ये सभापतींच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे. तसेच संबंधीत कागदपत्रे जोडलेली नाहीत. मीडिया रिपोर्टच्या आधारे ती बनविण्यात आल्याचा ठपका उप सभापतींनी ठेवला आहे. ही नोटीस योग्य स्वरूपातही नाही. घटनेच्या कलम 90 (C) च्या तरतुदीनुसार कोणताही प्रस्ताव आणण्यापूर्वी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. पण संसदेचे कामकाज २० डिसेंबरला संपत आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षनेते आणि इतर खासदारांनी दिलेली नोटीस मान्य नाही. ही नोटीस पूर्णपणे अयोग्य, त्रुटींनी भरलेली आहे, उपराष्ट्रपतींची प्रतिमा डागाळण्याचा हेतू आहे, यामुळे ही नोटीस नाकारत असल्याचे हरिवंश यांनी म्हटले आहे.