मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:02 PM2024-04-08T18:02:18+5:302024-04-08T18:03:14+5:30

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.

Big news Prakash Ambedkar Mahadev Jankar get new election symbols for lok sabha election 2024 | मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

Election Commission ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आलं असून रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसंच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून शड्डू ठोकलेल्या दिनेश बूब यांनाही शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे.

 महाराष्ट्रात यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली असून त्यांना नवे निवडणूक चिन्हही देण्यात आलं आहे. अशातच इतर छोट्या पक्षांना अद्याप निवडणुकीसाठी पक्षचिन्ह देण्यात आलं नसून त्या पक्षांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचं वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात येतं. आयोगाने आज ही प्रक्रिया पूर्ण करत छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप केलं आहे.

अकोल्यात तिरंगी सामना

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. वंचितने महाविकास आघाडीपासून वेगळं होत स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने काँग्रेसनेही अकोल्यात आपला उमेदवार दिला असून काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अकोल्यात यंदा तिरंगी सामना रंगणार आहे.

परभणीत जानकर विजयी 'शिट्टी' वाजवणार की 'मशाल' पेटणार?

परभणी लोकसभा मतदारसंघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिवसेना हा मूळ पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याने खासदार जाधव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या नव्या चिन्हासह लढाईच्या मैदानात उतरवं लागलं आहे. त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार असणाऱ्या महादेव जानकर यांना आता शिट्टी हे चिन्ह मिळालं असून परभणीत काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


 

Web Title: Big news Prakash Ambedkar Mahadev Jankar get new election symbols for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.