मोठी बातमी: संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, 'स्मोक कँडल'ने धूरही सोडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:31 PM2023-12-13T13:31:20+5:302023-12-13T13:41:36+5:30

Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली.

Big News: Serious lapse in Parliament security, two jump from audience gallery into Lok Sabha hall | मोठी बातमी: संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, 'स्मोक कँडल'ने धूरही सोडला!

मोठी बातमी: संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, 'स्मोक कँडल'ने धूरही सोडला!

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. तसेच या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. दरम्यान, या दोघांनाही पकडण्यात यश आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार तीन जणांनी संसद भवन परिसरामध्ये गोंधळ घातला असून, त्यांच्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यापैकी दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव सागर असल्याचे समोर आले आहे. तर संसदेबाहेर स्मोक कँडल पेटवणारा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर येत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असल्याचे समोर येत आहे. 

याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काही वस्तू फेकल्या. त्यातून धूर येत होता. मात्र या तरुणांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.  संसदेच्या सुरक्षेमधील ही गंभीर चूक आहे असा आरोपही अधीररंजन चौधरी यांनी केला. 

 

दरम्यान, आज १३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षं पूर्ण झाली आहे. त्याच दिवशी लोकसभेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. 

Web Title: Big News: Serious lapse in Parliament security, two jump from audience gallery into Lok Sabha hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.